IPL स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजांची आणि गोलंदाजांची महत्त्वाची आहे. २०१९ च्या अंतिम सामन्यात तर मुंबईला शेवटच्या टप्प्यात जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी तारलं. त्या दोघांच्या गोलंदाजीमुळे मुंबईला चौथ्यांदा विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. हे दोन गोलंदाज एका कायम आपल्या भेदक माऱ्याने आपल्या संघासाठी मॅच विनर ठरतात. याच दरम्यान भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने लसिथ मलिंगाबद्दल एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली.

लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही अत्यंत अचूक असा यॉर्कर चेंडू टाकण्यात सक्षम आहेत. या दोघांपैकी सर्वोत्तम कोण? असा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडतो. तसेच, यो दोघांपैकी यॉर्कर किंग कोण? असाही सवाल सामान्यपणे विचारला जातो. याचे उत्तर बुमराहने स्वत:च देऊन टाकले आहे. “मलिंगा हाच सर्वोत्तम यॉर्कर टाकणारा गोलंदाज आहे. सलग इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत तो त्याच वेगाने आणि अचूकपणे यॉर्करचा मारा करतो आहे. म्हणून तोच खरा यॉर्कर किंग आहे. इतक्या वर्षापासून तेच मलिंगाचे बलस्थान आहे”, असे बुमराहने सांगितले.

दरम्यान, एका मुलाखतीत बुमराहने मुंबई संघात मलिंगाशी नातं कसं असतं याबाबतही सांगितले. “अनेकांना वाटतं की लसिथ मलिंगाने मला यॉर्कर चेंडू कसा टाकायचा? ते शिकवलं. पण ते चुकीचं आहे. त्याने मला मैदानावरील कोणत्याही गोष्टी शिकवल्या नाहीत. मी त्याच्याकडून काही शिकलो असेल तर ते म्हणजे विचार करण्याची पद्धत… वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये गोलंदाजाने कशाप्रकारे विचार करावा, गोष्टी मनासारख्या घडत नसतील तरी गोलंदाजाने रागवायचे नाही, ठराविक फलंदाजासाठी ‘प्लॅन’ कसा आखावा, अशा काही गोष्टी मी त्याच्याकडून समजून घेतले आणि शिकलो”, असे बुमराहने मुलाखतीत सांगितलं.

तसेच, “लहानपणी आम्ही रबरी चेंडूने खेळायचो. त्याला शिवणीसारखे (सीम) डिझाईन असायचे. त्यामुळे ते चेंडू स्विंग व्हायचे. आम्ही जिथे खेळायचो; तिथे सीम मुव्हमेंट, विविध टप्प्यावरील गोलंदाजी किंवा यष्टीरक्षण अशा गोष्टी नसायच्या. केवळ चेंडू फलंदाजाच्या अंगावर टाकणे आणि पायात गोलंदाजी करून त्याला बाद करणे हाच आमचा उद्देश असायचा. जर तुम्हाला गडी बाद करायचा असेल, तर यॉर्कर चेंडू टाका असा साधा नियम आम्ही लहानपणापासूनच शिकलो. अजूनही त्याच एका गोष्टीमुळे मी यशस्वी गोलंदाज ठरतो”, असे बुमराहने नमूद केले.