आयपीएलच्या तेराव्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी सर्व तयारी सुरु केली असून २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत याबद्दल अंतिम निर्णय जाहीर होण्याचे संकेत आहेत. करोनामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय ही स्पर्धा सर्व नियमांचं पालन करुन आयोजित करावी लागणार आहे. सर्व संघमालकांनीही या स्पर्धेसाठी तयारी सुरु केल्याचं समजतंय. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच, गतविजेत्या मुंबई इंडियन्स समोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा महत्वाचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे.

श्रीलंका प्रिमीअर लिग स्पर्धेत सहभागी होत असल्यामुळे लसिथ मलिंगा आणि RCB संघाकडून खेळणारा अष्टपैलू इसरु उदाना हे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत. २८ ऑगस्ट रोजी श्रीलंका प्रिमीअर लिग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अद्याप या स्पर्धेचं अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. मात्र २८ ऑगस्ट रोजी सुरु झालेली ही स्पर्धा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात संपणार आहे. त्यातच नवीन नियमांप्रमाणे युएईमध्ये दाखल झाल्यानंतर मलिंगाला काही दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर मुंबई इंडियन्सला सुरुवातीचे काही दिवस मलिंगाशिवाय खेळावं लागणार आहे.

मलिंगाच्या अनुपस्थितीचा मुंबई इंडियन्सला फटका बसण्याची शक्यता आहे. मलिंगाशिवाय मुंबईकडे जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर-नाईल, हार्दिक पांड्या आणि धवल कुलकर्णी असे गोलंदाज आहेत. श्रीलंकेन खेळाडूंव्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडूही सुरुवातीचे काही सामने आयपीएल सामने खेळू शकणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे गव्हर्निंग काऊन्सिल तेराव्या हंगामाबद्दल काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.