भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका

भारतीय संघ रविवारी होणाऱ्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातील विजयासह २-० अशा निर्भेळ यशानिशी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला सामोरे जाण्यासाठी उत्सुक आहे. परंतु यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीची चिंता ही ऐरणीवर आहे.

मोहालीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने सात गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यात गोलंदाजांची कामगिरी आणि कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी महत्त्वाची ठरली. आता कसोटी मालिकेआधी आणखी एका वर्चस्वपूर्ण कामगिरीचा निर्धार संघाने केला आहे. धरमशाला येथील पहिला सामना पावसामुळे वाया गेला.

भारताच्या आक्रमणात पुरेशी अस्त्रे असताना दक्षिण आफ्रिकेकडे प्रतिहल्ल्यासाठी सशक्त पर्यायांचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. एम. चिन्नास्वामी  स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात आफ्रिकेचा संघ पुनरागमनासाठी सज्ज असेल.

मोहालीच्या आय. एस. बिंद्रा स्टेडियमवरील सामन्यात कोहलीच्या आक्रमक फलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी निरुत्तर झाली. आता ‘आयपीएल’मधील आपल्या गृहमैदानावर कोहली कोणती किमया दाखवतो, याविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे. उपकर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मोहालीत कॅगिसो रबाडाच्या नेतृत्वाखालील वेगवान माऱ्याचा आत्मविश्वासाने सामना केला. रोहित मोठय़ा खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरला. पंत धावांसाठी झगडत असताना मधल्या फळीत श्रेयस अय्यरमुळे भारताची फलंदाजीची ताकद वधारली आहे. याचप्रमाणे हार्दिक पंडय़ा आणि रवींद्र जडेजा हे दोघे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फटकेबाजी करण्यात वाकबगार आहेत. जसप्रित बुमरा आणि भुवनेश्वर कुमार या नियमित वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत दीपक चहर आणि नवदीप सैनी यांना संधीचे सोने करता येईल. वॉशिंग्टन सुंदरनेही अप्रतिम गोलंदाजी केली.

पंतची चिंता कायम

पंत दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्यावर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे. त्याच्या फलंदाजीतील परिपक्वता, फटक्यांची निवड आणि सातत्य हे त्याच्या फलंदाजीतील महत्त्वाच्या चिंता आहेत. महान फलंदाज सुनील गावस्कर यांचे मत पंतला दिलासा देणारे आहे. ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला जवळपास वर्ष बाकी असताना भारतीय क्रिकेटने महेंद्रसिंह धोनीच्या पलीकडे विचार करण्याची आवश्यकता आहे, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.

डीकॉकवर अपेक्षांचे ओझे

दक्षिण आफ्रिकेचा नवा कर्णधार क्विंटन डीकॉकच्या खांद्यावर नेतृत्वाच्या आणि फलंदाजीच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. डेव्हिड मिलर आणि रीझा हेन्ड्रिक्स यांच्याकडून त्याला साथ मिळण्याची आशा आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज वेगवान माऱ्याला समर्थपणे सामना करत असतानाही डीकॉकने फिरकी गोलंदाजांच्या हाती उशिरा चेंडू दिला होता. डीकॉकच्या रणनीतीबाबतही टीका होत आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डीकॉक (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रासी व्हॅन डर डुसेन, तेम्बा बव्हुमा, ज्युनियर डाला, जोर्न फॉच्र्युन, ब्युरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, अ‍ॅन्रिच नॉर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, जॉर्ज लिंडे.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, २,  स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १