आज हरयाणाविरुद्ध तिसरा सामना रंगणार
भारताविरुद्ध दोन हात करण्यापूर्वी इंग्लंडला सरावासाठी गुरुवारपासून हरयाणाशी होणारा सराव सामना ही अखेरची संधी असेल, कारण या सामन्यानंतर याच मैदानात इंग्लंडच्या संघाला भारताशी पहिला कसोटी सामना खेळावा लागणार आहे. पहिल्या दोन्ही सराव सामन्यांत इंग्लंडच्या संघाने वातावरणाशी जुळवून घेण्याचा सराव केला होता. आता या सामन्यासाठी ते कोणती रणनीती आखतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.
भारत ‘अ’ आणि मुंबई ‘अ’ यांच्याविरुद्धचे दोन्ही सराव सामने इंग्लंड खेळला आणि त्या अनिर्णीत राखल्या आहेत. भारताविरुद्धचा सामना येथेच होणार असल्याने इंग्लंड खेळपट्टीबरोबरच वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. या दौऱ्यात पहिल्या दोन्ही डावांत नापास ठरलेल्या निक कॉम्प्टनने दुसऱ्या सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक झळकावल्याने तो फॉर्मात आला असून या सामन्यात पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्याचे त्याचे ध्येय असेल. त्याचबरोबर दुसऱ्या सराव सामन्यात न खेळलेले कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि केव्हिन पीटरसन या सामन्यात खेळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गोलंदाजीमध्ये समित पटेल आणि माँटी पनेसार फिरकीची धुरा यशस्वीपणे वाहत असले तरी या सामन्यात ग्रॅमी स्वानला संधी देण्यात येईल. स्टुअर्ट ब्रॉडची दुखापत गंभीर स्वरूपाची नसून तो यामधून सावरत आहे, पण त्याला या सराव सामन्यात खेळवण्याची शक्यता फार कमी आहे.
भारताच्या दृष्टीने इंग्लंडला फिरकीपटूंपासून दूर ठेवणे, हेच ध्येय असेल. इंग्लंडने सामना जिंकला तरी भारतावर त्याचा मोठा फरक पडणार नाही, पण त्यांना फिरकीपटूचा सामना करायला मात्र भारत देणार नाही. हरयाणाच्या संघात नावाजलेले खेळाडू नसून त्यांनी हा सामना अनिर्णीत राखल्यास त्यांचा हा विजय असेल.
प्रतिस्पर्धी संघ
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक, जेम्स अँडरसन, इयान बेल, टीम ब्रेसनन, निक कॉम्प्टन, स्टीव्हन फिन, समित पटेल, केव्हिन पीटरसन, मॅट प्रायर, ग्रॅमी स्वान, जोनाथन ट्रॉट, स्टुअर्ट ब्रॉड, जो रुट, जॉनी बेअरस्टो, ग्रॅहम ओनियन्स, इऑन मॉर्गन आणि माँटी पनेसार.
हरयाणा : नितीन सैनी, राहुल दीवान, सन्नी सिंग, अभिमन्यू खोड, प्रियांक तेहलान, सी. सैनी, अमित मिश्रा, जे. यादव, के. आर. हुडा, अमित वशिष्ठ, मोगित शर्मा, युजवेंद्र चहल आणि कुलदीप हुडा.