ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं बॉर्डर-गावसकर चषकातील अखेरच्या कसोटी सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली. भेदक मारा करणाऱ्या सिराजपुढे ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी गुडघे टेकले आहेत. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजनं पाच विकेट घेतल्या आहेत. ब्रिस्बेनच्या मैदानावर तब्बल २००३ नंतर भारतीय गोलंदाजानं पाच विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. याआधी २००३ मध्ये जहीर खान यानं या मैदानावर पाच विकेट घेतल्या होत्या.

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सिराजनं आघाडीच्या तीन आणि तळाच्या दोन फलंदाजांना बाद केलं. सिराजनं मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड आणि स्मिथ या धोकादायक फलंदाजा माघारी पाठवलं. तर स्टार्क आणि हेजलवूडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावत सिराजनं एक विकेट घेतली होती. चौथ्या कसोटी सामन्यात सिराजनं सहा बळी घेतलेत.

आणखी वाचा- सिराजचा ऑस्ट्रेलियाला ‘पंच’; टीम इंडियापुढे विजयासाठी ३२८ धावांचं आव्हान

ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाकडून इरापल्ली प्रसन्ना यांनी सर्वात आधी पाच विकेट घेण्याचा कारनामा केला होता. इरापल्ली यांनी १९६८ मध्ये हा कारनामा केला होता. त्यानंतर १९७७ मध्ये मदनलाल आणि बिशनसिंग बेदी यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या होत्या. १९७७ नंतर २००३ मध्ये जहीर खान यानं या मैदानावर पाच विकेट घेतल्या होत्या.

रोहित शर्माने केलेली ती कृती स्मिथची नक्कल की टोमणा?; ‘हा’ Video ठरतोय चर्चेचा विषय

शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं २९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांची आवशकता आहे. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरनं प्रभावी गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजनं पाच बळी मिळवले तर शार्दुल ठाकूरनं ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांन तंबूत धाडलं. अष्टपैलू संदुरला एक बळी मिळाला. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियानं तर दुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. तिसरा कसोटी सामना भारतीय संघान अनिर्णीत राखला होता. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.