पहिला हिंदकेसरी किताब पटकावून महाराष्ट्राचं आणि कोल्हापूरच्या कुस्तीचं नाव भारतात गाजवणारे श्रीपती खंचनाळे यांचं सोमवारी वृद्धापकाळाने निधन झालं. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खंचनाळे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील कुस्ती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या तालमीत सराव करुन खंचनाळे यांनी कुस्तीत आपला दबदबा निर्माण केला. कुस्तीसोबतच खंचनाळे यांनी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राजकीय आखाडाही गाजवला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी खंचनाळे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना ही खास आठवण सांगितली.

“कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या खंचनाळे यांच्या मनात शेतकरी आणि शेती प्रश्नांबद्दल बरीच आस्था असायची. १९८८ साली शेतकरी चळवळीतले प्रमुख नेते शरद जोशी यांची सभा कोल्हापूरच्या गांधी मैदानावर होणार होती. यावेळी ही सभा न होऊ देण्याचा चंग सांगली आणि कोल्हापुरातील पुढाऱ्यांनी बांधला होता. यावेळी श्रीपती खंचनाळे यांनी निर्भीडपणे पुढे येत सभेचं अध्यक्षस्थान स्विकारलं. दादा व्यासपीठावर आहेत हे पाहताच सभा उधळण्यासाठी आलेली मंडळी शांत बसली. दादा व्यासपीठावर असताना गोंधळ करण्याची हिंमत कोणीही केली नाही. लाखापेक्षा जास्त जनसमुदाय या सभेला हजर होता. मध्यंतरीच्या काळात ते माझ्याकडे शेतकरी प्रश्नांबद्दल चौकशी करायचे.”

१९५९ मध्ये झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी किताब मिळवला होता. खंचनाळे हे मुळचे सीमाभागातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावचे रहिवासी. यानंतर कुस्तीच्या निमीत्ताने गेली अनेक वर्ष ते आपल्या परिवारासोबत कोल्हापुरात वास्तव्यास होते. विविध कुस्ती स्पर्धेत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजवला. नवीन मल्लांना तालमीत धडे देण्याचे काम ते करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध कुस्ती मैदाने गाजवली आहेत.