करोनाची साथ अजून पूर्णपणे आटोक्यात आली नसली तरी नियमांचे पालन करत जर्मनीत बुंडेसलिगा फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. बुंडेसलिगाच्याच धर्तीवर आता युरोपातील अन्य देशांमध्येही फुटबॉल सामन्यांना सुरुवात करण्याच्या दृष्टीने धोरणे आखण्यात येत आहेत.

प्रेक्षकांशिवाय जर्मनीतील या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. जर्मनीत युरोपातील अन्य देशांच्या तुलनेत करोनाचा हाहाकार कमी आहे. मात्र तरीदेखील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याचा धोका पत्करण्यात आला नाही.

करोनाचा संसर्ग खेळाडूंना होऊ नये, यासाठी कोणते नियम पाळणे आवश्यक आहे. त्याची आचारसंहिता जर्मन फुटबॉल लीगकडून देण्यात आली होती. त्यानंतरच जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष अँजेला मर्केल यांच्यासह त्या देशातील नेत्यांनी फुटबॉल हंगामातील उर्वरित नऊ सामन्यांना सुरुवात करण्यासाठी परवानगी दिली. शनिवारची लढत

बोरुसिया डॉर्टमंड आणि शाल्के या दोन स्थानिक संघांमध्ये होती. रविवारी (१७ मे) गतविजेते बायर्न म्युनिक  युनियन बर्लिनशी झुंजणार आहे.

प्रीमियर लीगबाबत खेळाडू अनुत्सुक

जर्मनीत बुंडेसलिगा लीग फुटबॉल स्पर्धा सुरू झाली असली तरी इंग्लंडमध्ये इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पर्धा जूनपासून सुरू करायची की नाही, याबाबत खेळाडू संभ्रमात आहेत. ‘ईपीएल’च्या काही खेळाडूंनी करोनाच्या धोक्यात खेळण्यास नकार दिला आहे. मात्र आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी हंगामातील उर्वरित सामने खेळवणे आवश्यक असल्याचे स्पर्धेच्या आयोजकांना वाटत आहे. वॉटफर्ड संघाचा कर्णधार ट्रॉय डीने म्हणाला की, ‘‘मी खेळून माझ्या कुटुंबाचा धोका वाढवू इच्छित नाही. मी सध्या फुटबॉलविषयी काही बोलतही नाही.  मी फक्त कुटुंबीयांच्या प्रकृतीविषयी बोलत आहे. जर मी खेळलो नाही तर माझे पैसे कापण्यात येतील. मात्र सध्या मला पैशांपेक्षा कुटुंबाच्या प्रकृतीची चिंता आहे. प्रेक्षकांशिवाय सामने २०२१ पर्यंत खेळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रेक्षकांची काळजी आहे तशीच खेळाडूंचीही करावी.’’ मॅँचेस्टर सिटीचे सर्जियो अ‍ॅग्युरो आणि रहीम स्टर्लिग यांनीही खेळण्यास नकार दिला आहे.

हिग्युएन इटलीमध्ये दाखल : मिलान : अर्जेटिनाचा अव्वल फुटबॉलपटू गोन्झ्ॉलो हिग्युएन इटलीच्या युव्हेंटस संघात दाखल होणारा अखेरचा खेळाडू ठरला आहे. इटलीतील ‘सेरी ए’ फुटबॉल स्पर्धेला १३ जूनपासून सुरुवात होणे अपेक्षित आहे. त्यासाठी खासगी विमानाने हिग्युएन इटलीमध्ये दाखल झाला आहे. नियमाप्रमाणे पुढील दोन आठवडे हिग्युएन विलगीकरणात असेल.