एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली BCCI ची निवड समिती गुरुवारी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. प्रसाद आणि पूर्व विभागाचे प्रतिनिधी गगन खोडा यांनी आपला ४ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यामुळे गुरुवारची बैठक त्यांची अखेरची बैठक ठरु शकते. मिळालेल्या माहितीनुसार भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्याकडे निवड समितीच्या अध्यक्षपदाची सूत्र जाऊ शकतात. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत याविषयी अंतिम निर्णय होणार आहे.

सध्या बीसीसीआयमध्ये निवड समितीवरुन खलबतं सुरु आहेत. काही अधिकाऱ्यांच्या मते सध्या असलेली निवड समिती पूर्णपणे बरखास्त करत नवीन निवड समिती नेमण्यात यावी. मात्र प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ज्युनिअर संघाच्या निवड समितीचे सदस्य ग्यानेंद्र यांना शिवरामकृष्णन यांच्या समितीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. जतीन परांजपे, देवांग गांधी आणि शरणदीप सिंह यांचा निवड समितीतला कार्यकाळ अजून शिल्लक आहे.

अवश्य वाचा – विंडीज दौऱ्यात भारताच्या ‘हिटमॅन’ला विश्रांती मिळण्याची शक्यता !

मध्यंतरी प्रसाद यांच्या निवड समितीला टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. २०१९ विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, शर्यतीत असलेल्या खेळाडूंना गाळणं तसंच चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी एकही योग्य पर्याय न शोधणं यामुळे निवड समितीला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. निवड समिती सदस्यांना मिळणारा कमी पगार यामुळे कोणत्याही माजी खेळाडूने या पदासाठी रस दाखवला नव्हता, मात्र शिवरामकृष्णन यांनी आपलं समालोचनाचं काम बाजूला ठेवत या पदासाठी रस दाखवला आहे.

मध्यंतरी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनीही निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी रस दाखवला होता. मात्र बीसीसीआयला या पदासाठी सध्याच्या क्रिकेटपटूंशी जुळवून घेऊन नवीन कल्पनांवर काम करेल असा उमेदवार हवा आहे. त्यामुळे वेंगसरकरांचं नाव मागे पडण्याची चिन्ह आहेत. याचसोबत भारताचा माजी यष्टीरक्षक विजय दाहीयाही या पदासाठी शर्यतीत असल्याचं समजतंय. त्यामुळे अखेरीस अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.