भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका

इंग्लंडला ६६ धावांनी नमवून मालिकेत आघाडी

डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिश्तच्या प्रभावी फिरकी माऱ्याच्या बळावर भारताने आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेमधील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६६ धावांनी शानदार विजय मिळवला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना २०३ धावा उभारल्या होत्या. मात्र एकताने २५ धावांत चार बळी घेण्याची किमया साधल्यामुळे इंग्लंडचा डाव ४१ षटकांत १३६ धावांत आटोपला. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

इंग्लंडकडून फक्त नताली शिव्हर (४४) आणि हिदर नाइट (नाबाद ३९) यांनी भारतीय गोलंदाजीचा हिमतीने सामना केला. एकताला वेगवान गोलंदाज शिखा पांडे (२/२१), दीप्ती शर्मा (२/३३) आणि अनुभवी झुलन गोस्वामी (१/१९) यांचे साह्य़ लाभले. त्यामुळे भारताने आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेत दोन गुण आरामात मिळवले.

भारताच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ३० षटकांत ३ बाद १११ अशी दमदार मजल मारली होती. मात्र उर्वरित सात फलंदाज त्यांनी फक्त २४ धावांत गमावले.

त्याआधी, नाणेफेक जिंकून इंग्लंडने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जेमिमा रॉड्रिग्ज आणि सलामीवीर स्मृती मानधना (२४) यांनी ६९ धावांची दमदार सलामी नोंदवली. जेमिमाने ५८ चेंडूंत ४८ धावा केल्या, तर कर्णधार मिताली राजने ७७ चेंडूंत ४४ धावा काढल्या. मग मिताली आणि यष्टिरक्षक तानिया भाटिया (२५) यांनी सहाव्या गडय़ासाठी ५४ धावांची भागीदारी केली. मग अनुभवी झुलन गोस्वामीने तीन चौकार आणि एका षटकारासह ३७ चेंडूंत ३० धावा केल्यामुळे भारताला द्विशतकाचा टप्पा गाठता आला.

संक्षिप्त धावफलक

भारत : ४९.४ षटकांत सर्व बाद २०२ (जेमिमा रॉड्रिग्ज ४८; सोफी ईक्लेस्टोन २/२७) विजयी वि. इंग्लंड : ४१ षटकांत सर्व बाद १३६ (नताली शिव्हर ४४; एकता बिश्त ४/२५)

*  सामनावीर : एकता बिश्त