दुहेरीचा सामना जिंकून न्यूझीलंडचे आव्हान कायम; भारत २-१ अशा आघाडीवर

भारतीय टेनिसचा लिएण्डर पेस हा खरा चेहरा आहे व त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक अनेक अडचणींवर मात करून येतात. पेस व विष्णू वर्धन यांच्याविरुद्ध आर्तेम सिटेक व मायकेल व्हीनस यांनी दुहेरीत विजय मिळवीत न्यूझीलंडचे आव्हान कायम राखले. अर्थात हा सामना गमावल्यानंतरही प्रेक्षकांनी उभे राहून व टाळ्यांच्या कडकडाटात पेसला त्याच्या आजपर्यंतच्या कामगिरीचीच पावती दिली. मात्र, डेव्हिस चषक स्पध्रेत सर्वाधिक विजय मिळवून विक्रम प्रस्थापित करण्याच्या पेसच्या मार्गात खंड पडला आहे. आजच्या लढतीत विजय मिळवून सर्वाधिक ४३ विजय मिळवण्याचा पेसचा मनसुबा होता. इटलीचा निकोला पिएत्रांगेली आणि पेस यांच्या नावावर प्रत्येकी ४२ विजय आहेत.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या लढतीत न्यूझीलंडच्या जोडीने ३-६, ६-३, ७-६ (८-६), ६-३ असा दुहेरीचा सामना जिंकून लढतीमधील उत्कंठा कायम राखली. भारताने पहिल्या दिवशी एकेरीचे दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे दुहेरीच्या लढतीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. त्यातही पेस हाच सामन्याचा मुख्य आकर्षण केंद्रबिंदू होता. पेस याचा हा कदाचित शेवटचा डेव्हिस सामना असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याचा खेळ पाहण्यासाठीच जवळजवळ चार हजार प्रेक्षक उपस्थित राहिले होते.

परतीचे फटके, नेटजवळून प्लेसिंग, बॅकहँड व्हॉलीज असा चतुरस्र खेळ करताना पेस व वर्धन यांनी दाखविलेला समन्वय अतुलनीय होता. वर्धन हा पेसपेक्षा चौदा वर्षांनी लहान असला तरीही त्याने पेस याला यथोचित साथ दिली. पहिल्या सेटमध्ये आवश्यक असणारा महत्त्वपूर्ण सव्‍‌र्हिस ब्रेक त्यांनी सहाव्या गेमच्या वेळी मिळविला. त्यांनी मायकेलची सव्‍‌र्हिस तोडली. या सेटमध्ये वर्धन याने बिनतोड व अचूक सव्‍‌र्हिसचा कल्पकतेने उपयोग केला. पेस याचा भर नेटजवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या सवर्ि्हस व परतीचे फटके रोखण्यावर होता. न्यूझीलंडच्या सिटेक व व्हीनस यांनी काही बिनतोड सव्‍‌र्हिस केल्या. मात्र प्लेसिंगमध्ये ते कमी पडले.

दुसऱ्या सेटमध्ये सिटेक व व्हीनस यांना सूर सापडला. त्यांनी पासिंग शॉट्स, बिनतोड सव्‍‌र्हिस व परतीचे खणखणीत फटके असा बहारदार खेळ केला. या सेटमध्ये आवश्यक असणारा सव्‍‌र्हिस ब्रेक त्यांनी चौथ्या गेमच्या वेळी मिळविला. तेथून त्यांनी सामन्यावर नियंत्रण राखले. या सेटमध्ये पेस व वर्धन यांच्या खेळातील मर्यादा स्पष्टपणे दिसल्या. हा सेट घेत सिटेक व व्हीनस यांनी सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये भारताला दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेकची संधी मिळाली होती. मात्र कमकुवत परतीचे फटके मारत भारतीय जोडीने ही संधी गमावली. हा सेट टायब्रेकपर्यंत गेला. तेथेही पुन्हा भारतीय जोडीच्या तुलनेत सिटेक व व्हीनस यांनी केलेला आक्रमक खेळच सरस ठरला. टायब्रेकर ८-६ असा घेत सिटेक व व्हीनस यांनी तिसरा सेट मिळविला.

लागोपाठ दोन सेट गमावल्यानंतर भारतीय जोडीचा पराभव निश्चित झाला होता. तरीही प्रेक्षकांनी पेस याच्या खेळास भरपूर दाद दिली. चौथ्या सेटमध्ये दुसऱ्या गेमच्या वेळी न्यूझीलंडला अपेक्षित सव्‍‌र्हिस ब्रेक मिळाला. भारतीय जोडीने तीन गेम्स घेऊनही त्यांना न्यूझीलंडची आघाडी तोडता आली नाही. आठव्या गेमच्या वेळी पेसची सव्‍‌र्हिस तोडून सामना जिंकण्याची संधी न्यूझीलंडला साधता आली नाही. मात्र नवव्या गेममध्ये त्यांनी सव्‍‌र्हिस राखून सामना जिंकला.

अजूनही सामना आमच्या हातात आहे. उर्वरित एकेरीच्या दोन सामन्यांपैकी एक सामना आम्ही निश्चित जिंकू. युकी व रामकुमार हे अतिशय चांगले खेळत आहेत. पेस याने खूप चांगला खेळ केला. मात्र आम्हाला त्याच्या कामगिरीचे विजयात रूपांतर करता आले नाही.   – आनंद अमृतराज