भारताच्या लिएण्डर पेसने शुक्रवारी स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या विजेतेपदावर कब्जा केला. पेस – मार्टिना या चौथ्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत अमेरिकेच्या सॅम क्वेरी आणि बेथनी मॅटेक-सँड्स या जोडीचा ६-४, ३-६, १०-७ असा पराभव केला. पेस आणि हिंगिस या जोडीचे हे यंदाच्या मोसमातील तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. टेनिसविश्वात अशाप्रकारची कामगिरी करणारी पेस-हिंगिस ही दुसरीच जोडी ठरली आहे. मार्टी रायसन आणि मार्गारेट या जोडीने ४६ वर्षांपूर्वी अशी कामगिरी करून दाखविली होती.
अमेरिकन ओपनच्या या जेतेपदासह लिअँडर पेसनं महेश भूपतीचा ओपन इरामध्ये मिश्र दुहेरीत सर्वाधिक विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला. पेस हा ओपन इरामध्ये मिश्र दुहेरीत नऊ ग्रँड स्लॅम किताब मिळवणारा पहिलाच पुरुष टेनिसपटू ठरला.केवळ मार्टिना नावरातिलोव्हानेच मिश्र दुहेरीत सर्वाधिक दहा ग्रँड स्लॅम विजेतपदे जिंकली आहेत. पेसच्या नावावर आता पुरुष दुहेरीची आठ आणि मिश्र दुहेरीची नऊ अशी सतरा ग्रँड स्लॅम जमा झाली आहेत. तर मार्टिना हिंगिसने महिला एकेरीत पाच, महिला दुहेरीत दहा आणि मिश्र दुहेरीत चार विजेतीपदे पटकावली आहेत.