डेव्हिस चषक  टेनिस स्पर्धा

एकेरीचे पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर भारतीय संघ डेव्हिस चषक टेनिस लढतीत पराभवाच्या छायेत सापडला होता. मात्र युवा पिढीपुढे आदर्श असलेल्या लिएण्डर पेसने विश्वविक्रम केला. त्याच्यापासून प्रेरणा घेत भारतीय खेळाडूंनी एकेरीचे परतीचे दोन्ही सामने जिंकले आणि चीनवर ३-२ असा सनसनाटी विजय नोंदवला.

चीनच्या युवा खेळाडूंनी या लढतीच्या पहिल्या दिवशी एकेरीचे दोन्ही सामने जिंकून धडाकेबाज प्रारंभ केला होता. त्या वेळी भारतीय संघावर आशिया/ ओशेनिया विभागातूनच बाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र ४४ वर्षीय पेसने रोहन बोपण्णाच्या साथीत दुहेरीत माओ झिन गोंग व झेई झांग यांच्यावर ५-७, ७-६ (७-५), ७-६ (७-३) अशी मात केली व भारताचे आव्हान राखले. हा सामना जिंकून पेसने स्पर्धेतील दुहेरीत सर्वाधिक ४३ सामने जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदवला. एकेरीच्या परतीच्या सामन्यात रामकुमार रामनाथनने देई वुई याला ७-६ (७-४), ६-३ असे पराभूत करत लढतीत २-२ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या लढतीत संघाचा न खेळणारा कर्णधार महेश भूपतीने सुमित नागलच्या ऐवजी डावखुरा खेळाडू प्रजनेश गुणेश्वरनला पाचारण केले. त्याची ही चाल यशस्वी ठरली. त्याने चीनचा युवा खेळाडू यिबिंग युईचा ६-४, ६-२ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला आणि संघाला ३-२ अशी विजयश्री मिळवून दिली. या विजयामुळे भारताने जागतिक प्लेऑफ विभागात स्थान मिळवले आहे.

भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू युकी भांब्रीने दुखापतीमधून या लढतीतून माघार घेतल्यामुळे गुणेश्वरनला संधी मिळाली होती. त्याचा हा दुसराच डेव्हिस चषक सामना आहे. तरीही त्याने कोणतेही दडपण न घेता खेळ केला. तो डावखुरा असल्यामुळे यिबिंगला परतीच्या फटक्यांवर प्रत्युत्तर देणे अवघड गेले. गुणेश्वरनने अचूक सव्‍‌र्हिस व पासिंग शॉट्स याचा बहारदार खेळ केला व आपल्या कर्णधाराने सोपविलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.

भारताने जागतिक प्लेऑफमध्ये पाचव्यांदा प्रवेश केला आहे. याआधी त्यांना प्लेऑफमध्ये सर्बिया (२०१४), चेक प्रजासत्ताक (२०१५), स्पेन (२०१६) व कॅनडा (२०१७) यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. जागतिक स्तरावरील अव्वल सोळा देशांच्या गटात भारताला २०११ मध्ये सर्बियाविरुद्ध पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले होते.

या विश्वविक्रमाचे श्रेय भारतालाच – पेस

‘‘भारतीय भूमीत मी जन्माला आलो, हे माझे भाग्य आहे. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत नोंदवलेला विश्वविक्रम माझ्या एकटय़ाचा नसून जीवनात साथ देणाऱ्या सर्व भारतीयांचा आहे. त्यामध्ये माझे आईवडील, माझी कन्या आयना व माझ्याबरोबर अनेक वर्षे साथ देणारे साहाय्यक प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा वाटा आहे,’’ असे लिएण्डर पेसने सांगितले.

खेळाडूच्या कारकीर्दीत चढउतार येतच असतात, मात्र त्यास यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी मानसिक कणखरता व आत्मविश्वास आवश्यक असतो. मी अपयशाने कधीच खचलो नाही किंवा विजयाचा कधीही उन्माद केला नाही. त्यामुळेच टेनिस क्षेत्रात अजूनही टिकून राहिलो आहे, असे सांगून पेस म्हणाला, ‘‘चीनविरुद्धच्या लढतीत पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताला पराभवाच्या छायेतून बाहेर काढण्याची जबाबदारी माझ्यावर होती. या स्पर्धेत आजपर्यंतचा माझा अनुभवच कामी आला. त्यामुळेच अशक्य वाटणारा विजय आम्ही खेचून आणला. भारतीय संघ विश्वविजेता होईल अशी मला खात्री आहे. जेव्हा जेव्हा देशाला माझी गरज असते, तेव्हा तेव्हा देशासाठी खेळण्यास मी तयार असतो.’’

पेसची कमाल

या स्पर्धेत दुहेरीचे ४२ सामने जिंकण्याचा विश्वविक्रम इटलीचे निकोला पित्रांगेली यांच्या नावावर होता. त्या विक्रमाशी पेसने बरोबरी केली होती. पेस हा निवृत्तीच्या उंबरठय़ावर असल्यामुळेच ४३ सामने जिंकण्याचा विक्रम तो नोंदविणार की नाही हीच येथे उत्सुकता होती. पेसने बोपण्णाच्या साथीत हा विश्वविक्रम नोंदविलाच, पण या लढतीस भारताच्या बाजूने कलाटणीही दिली. पेसला या लढतीसाठी संधी दिल्यानंतर बोपण्णाने दुहेरीत खेळण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. मात्र अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने पेसच्या साथीत त्याने भाग घेणे अनिवार्य असल्याचा आदेश दिल्यानंतर बोपण्णाने मवाळ भूमिका घेतली व पेससमवेत भाग घेतला. त्याच्या झंझावाती सव्‍‌र्हिस व पेसचा चतुरस्र खेळ यामुळे दुहेरीत भारतास विजय मिळविता आला. पेसने १९९० मध्ये पहिल्यांदा डेव्हिस चषक स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. त्या वेळी १६ वर्षीय पेसने झिशान अलीसमवेत दुहेरीत भाग घेतला होता. त्यानंतर त्याने भूपतीसह सलग २४ सामने जिंकले आहेत.