सलग आठव्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याचे माझे उद्दिष्ट असून, पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी मी खडतर मेहनत घेत आहे, असे भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने सांगितले.
२०१९च्या नाताळमध्ये पेसने ‘एकदा अखेरची गर्जना’ या शीर्षकासह २०२० हा व्यावसायिक टेनिस कारकीर्दीतील अखेरचा हंगाम असल्याचे जाहीर केले होते. पण त्यावेळी करोनाची इतकी मोठी आपत्ती येईल, अशी कुणालाही कल्पना नव्हती. या साथीने सर्वापुढे आव्हान निर्माण केले आहे, असे पेसने सांगितले.
‘‘करोनाच्या साथीमुळे प्रदीर्घ काळाची विश्रांती मिळाली. या काळात शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा सज्ज होता आले. भारताचे नाव इतिहासात अधोरेखित व्हावे, हाच माझा नेहमी उद्देश असतो. त्यामुळेच मी गेली ३० वर्षे अथक मेहनत घेत आहे,’’ असे पेस म्हणाला.
टोक्यो ऑलिपिकला २३ जुलैपासून प्रारंभ होणार असून, या स्पर्धेदरम्यान पेस ४८ वर्षांचा होईल. परंतु वय हा फक्त आकडा असतो, असे त्याने सांगितले. ‘‘सातव्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा विक्रम माझ्या नावे आहेच. आठव्या ऑलिम्पिकमध्ये हा विक्रम आणखी उंचावेल,’’ असे प्रतिपादन पेसने केले. १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पेसने वैयक्तिक कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती.
दुहेरीत कुणाच्या साथीने हे बिगरमहत्त्वाचे!
ऑलिम्पिकच्या दुहेरी गटात दिविज शरण किंवा रोहन बोपण्णा यांच्यापैकी तुला कुणाच्या साथीने खेळायला आवडेल. या प्रश्नाला उत्तर देताना पेस म्हणाला, ‘‘आठव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचा विश्वविक्रम माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. त्यामुळे देशासाठी खेळताना दुहेरीत कुणाच्या साथीने खेळणार हे अजिबात महत्त्वाचे नाही. पुरुष दुहेरीत दिविज असो किंवा रोहन तसेच मिश्र दुहेरीत अंकिता रैनाच्या साथीनेही खेळू शकेन.’’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 12:09 am