पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीतून अनुभवी लिएण्डर पेसने माघार घेतली आहे. सोमदेव देववर्मनच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय संघाची निवड समितीने घोषणा केली. १७ ते १९ जुलै या कालावधीत ख्राइस्टचर्च येथे ही लढत होणार आहे.
गेल्या वर्षी सर्बियाविरुद्ध झालेल्या लढतीत भारताला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या लढतीत पेस सहभागी झाला होता. पेसच्या अनुपस्थितीत रोहन बोपण्णा आणि साकेत मायनेनी यांच्यावर दुहेरीची भिस्त आहे. राखीव खेळाडू म्हणून युवा रामकुमार रामनाथन याची निवड करण्यात आली आहे. एकेरीची जबाबदारी सोमदेव आणि युकी भांब्री यांच्यावर असणार आहे.
दरम्यान, न्यूझीलंडमधील थंड वातावरणात खेळणे आव्हानात्मक असेल. विम्बल्डननंतर खेळाडू ख्राइस्टचर्चसाठी रवाना होतील, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक झीशान अली यांनी सांगितले. डेव्हिस चषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सात लढतींत भारताने चार वेळा न्यूझीलंडवर मात केली आहे.