कारकिर्दीतील विक्रमी २५व्या हंगामात खेळणाऱ्या भारताच्या लिएण्डर पेसने रावेन लासेनच्या साथीने खेळताना चेन्नई टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. एकेरी प्रकारात ग्रँड स्लॅम विजेता स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने संघर्षमय लढतीनंतर उपांत्य फेरीत आगेकूच केली.
पेस-लासेन जोडीने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टा आणि गिइलरमो गार्सिआ लोपेझ जोडीवर ६-३, ६-३ अशी मात केली. अंतिम फेरीत विजयासह चेन्नई स्पर्धेचे सातवे जेतेपद पटकावण्याची पेसला संधी आहे. याआधी पेसने महेश भूपतीच्या साथीने खेळताना पाच तर राडेक स्टेपानेकच्या साथीने खेळताना एकदा या स्पर्धेचे जेतेपद नावावर केले आहे.  ‘‘आकडेवारी, विक्रम माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. चेन्नईतील चाहत्यांसमोर सर्वोत्तम प्रदर्शन करणे उद्दिष्ट आहे. लासेनसह माझी भागीदारी नवीन आहे, मात्र उपांत्य फेरीच्या लढतीने आत्मविश्वास मिळाला आहे,’’ असे पेसने सांगितले.
गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करणाऱ्या वॉवरिन्काने आठव्या मानांकित गिल्स म्युलरवर ६-२, ७-६ (४) अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. स्लोव्हेनियाच्या अलिझ बेडनेने पाचव्या मानांकित गिइलरमो गार्सिओ लोपेझला २-६, ६-३, ६-२ असे नमवले. रॉबर्ट बॉटिस्टाने सहाव्या मानांकित आणि तैपेईच्या येन ह्स्युन ल्युचा ७-६ (७), ६-४ असा पराभव केला. डेव्हिड गॉफिनने आंद्रेस हैदर मौररवर ७-५, ६-२ असा विजय मिळवला.