आयपीएलनंतर स्थानिक क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी करत नमन ओझाने भारतीय संघात स्थान मिळवले होते. श्रीलंकेमधील कसोटी मालिकेतील १-१ अशा बरोबरीनंतर खेळवण्यात आलेल्या निर्णायक सामन्यात ओझा खेळला. पण काही चुकांमुळे त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्याला संघातून डच्चू देण्यात आला. पण या चुकांमधून बरेच काही शिकलो असल्याचे ओझाने सांगितले.

‘‘स्थानिक सामन्यांबरोबर श्रीलंकेतील कसोटी सामन्यांमधल्या चुकांमधून मी बरेच काही शिकलो आहे. त्यानुसार चुका टाळून खेळपट्टीवर अधिक काळ व्यतीत करायचे माझे ध्येय असेल. मी माझी विकेट आंदण देणार नाही, गोलंदाजांनी मेहनत करून मला बाद करण्याचा प्रयत्न करावे,’’ असे दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर ओझा म्हणाला.
श्रीलंकेतील कसोटी सामन्यात ओझाला नेत्रदीपक कामगिरी करता न आल्याने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. पण या सामन्यातील अर्धशतकामुळे उर्वरित कसोटी सामन्यांसाठी निवड समिती त्याच्या नावाचा विचार करू शकते.
अध्यक्षीय संघाकडून खेळताना अर्धशतक केल्यानंतर ओझा म्हणाला की, ‘‘ही खेळी माझ्यासाठी फार महत्त्वाची होती. या खेळीने माझा आत्मविश्वास उंचावला आहे. ज्या पद्धतीने मी ही खेळी उभारली ते पाहता पुढच्या सामन्यासाठी माझा आत्मविश्वास उंचावला आहे. जेव्हा तुमच्या खात्यामध्ये धावा असतात, तेव्हा तुमच्यासाठी पुढचा सामना खेळणे सोपे असते.’’