भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटीचा दुसरा दिवस गाजवला तो भारताचा तरुण यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने. त्याने त्याने षटकार-चौकारांचा पाऊस पाडला व आपल्या शतकी खेळीच्या बळावर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डगमगता डाव सावरला. या शतकासोबतच पंतने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट याच्या एका विक्रमाशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत या तिन्ही देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा गिलख्रिस्टनंतर रिषभ पंत हा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला. त्यावर गिलख्रिस्टने ट्विटरद्वारे पंतचे कौतुक केले. तर गिलख्रिस्टकडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर पंतनेही त्यावर गिलख्रिस्टचे आभार मानलेत.

“तुम्ही किती धावा करता याला महत्त्व नसतं, पण तुम्ही कोणत्या परिस्थितीत त्या धावा काढतात ते महत्त्वाचं असतं. संघाला जेव्हा सर्वाधिक गरज असते तेव्हा धावा केल्यास तुम्ही खरे मॅच विनर असतात, अशा शब्दात पंतच्या शतकी खेळीचं ट्विटरवर कौतुक करत गिलख्रिस्टने रिषभ पंतलाही टॅग केलं होतं. त्यावर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपताच रिषभ पंतनेही रिप्लाय दिला.

2021 मधला बेस्ट शॉट! पंतच्या ‘त्या’ अफलातून फटक्यावर फिदा झाला माजी खेळाडू, बघा Video

“तुमच्याकडून कौतुकाची थाप मिळणं माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे…इतक्या वर्षांपासून तुम्हाला बघूनच खूप काही शिकलोय” असं ट्विट करत पंतने गिलख्रिस्टचे आभार मानले.

Video : क्या बात! ६०० टेस्ट विकेट घेणाऱ्या अँडरसनच्या बॉलिंगवर पंतने मारला भन्नाट शॉट, दिग्गजही हैराण

दरम्यान, शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकीकडे दिग्गज भारतीय फलंदाज अपयशी ठरत असताना पंतने धडाकेबाज खेळी करत ११८ चेंडूत १०१ धावा केल्या. त्याने वॉशिंग्टन सुंदरच्या मदतीने टीम इंडियाचा डाव सावरला. पंतने वॉशिंग्टनसोबत सातव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना भारताची धावसंख्या २९४ धावांवर सात गडी बाद झाली व भारताने ८९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.