मलेशियाच्या ली जी जियाने अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या गतविजेत्या व्हिक्टर अ‍ॅक्सलसेनचा पराभव करत ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या पुरुष गटात बाजी मारली. एक तास 14 मिनिटे चाललेल्या या चित्तथरारक सामन्यात ली जीने अ‍ॅक्सलसेनला 30-29, 20-22, 21-19 असा पराभव केला.

 

ली जी जिया आणि व्हिक्टर अ‍ॅक्सलसेनमधील हा सामना अलिकडच्या काळात झालेल्या सर्वोत्तम बॅडमिंटन सामन्यांपैकी एक होता. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ली जी जियाने अ‍ॅक्सलसेनला मात दिली. त्यानंतर पुढच्या सेटमध्ये अ‍ॅक्सलसेनने दमदार पुनरागमन केले. निर्णायक सेटमध्ये ली जी जियाने आघाडी मिळवत  सामना आणि किताब नावावर केला.

विजयानंतर लीची प्रतिक्रिया

ली म्हणाला, “मी आनंदी, उत्साही आणि दुःखीसुद्धा आहे. सर्व काही क्षणार्धात समोर येत आहे, म्हणून मला माझी भावना दर्शविणे कठीण आहे. तिसर्‍या सेटद्वारे आम्ही दोघांनी चमकदार कामगिरी बजावली. तिसर्‍या गेममध्ये, अ‍ॅक्सलसेनने लक्ष गमावले आणि मला त्याचा फायदा झाला.”

तो म्हणाला, ”पहिला सेट खूप कठीण होता. दुसऱ्या सेटमध्ये मी प्रत्येक अंकांवर लक्ष केंद्रित केले. मला लक्ष हटू द्यायचे नव्हते. याचा फायदा माझ्या विरोधी खेळाडूला झाला असता.”

महिलांमध्ये ओकुहाराचा विजय

जपानची अव्वल महिला बॅडमिंटनपटू नोझोमी ओकुहाराने ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. दुसऱ्या सीडेड ओकुहाराने अंतिम सामन्यात थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगला 21-12, 21-16 असे सहज हरवले. 2016मध्ये ओकुहाराने ही स्पर्धा जिंकली होती.