पाचवेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला लिजंड्स बुद्धिबळ स्पर्धेत सलामीला रशियाच्या पीटर स्विडलरकडून १.५-२.५ पराभव स्वीकारावा लागला. विश्वविजेत्या नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आयोजित ऑनलाइन स्पर्धेत आनंद प्रथमच सहभागी झाला आहे.

मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीत स्विडलरविरुद्धच्या पहिल्या तीन डावांमध्ये आनंदला बरोबरी साधता आली होती. मात्र अखेरच्या डावात आनंद पराभूत झाला आणि त्याने पहिली फेरीही गमावली. मे महिन्यानंतर आनंद प्रथमच ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाला आहे. स्विडलरविरुद्धच्या लढतीत पहिल्या डावापासून दोघांमध्ये चुरस रंगली होती. मात्र चौथ्या आणि अखेरच्या डावात आनंदला पराभव पत्करावा लागला.

अन्य खेळाडूंमध्ये बोरिस गेलफंडने लक्ष वेधून घेतले. त्याने तिसरा मानांकित चीनच्या डिंग लिरेनवर ३-१ असा धक्कादायक विजय मिळवला. अग्रमानांकित कार्लसनने हॉलंडच्या अनिश गिरीला ३-१ असे सहज नमवले. रशियाचा इयान नेपोमनियाचीने व्लादिमिर क्रॅमनिकला ३-२ आणि आणि हंगेरीचा पीटर लेकोने व्हॅसिल इवानचुकला ३-२ नमवत विजयी सलामी दिली. कार्लसन आयोजित या स्पर्धेत स्वत: कार्लसन, लिरेन, नेपोमनियाची आणि गिरी यांना थेट प्रवेश मिळाला. कारण या चौघांनी याआधीच्या चेसेबल मास्टर्स या कार्लसन आयोजित स्पर्धेतच उपांत्य फेरी गाठली होती.