कार्लसन २२ गुणांसह अग्रस्थानी कायम

चेन्नई : पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सातवा पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली. आनंदचा आठव्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनकडून ०-५-२-५ पराभव झाला.

आनंदला लिरेनविरुद्धच्या लढतीत पहिल्याच डावात अवघ्या २२ चालींमध्ये पराभव पत्करावा लागला. दुसरा डाव दोघांनी ४७ चालींत बरोबरीत सोडवला. तिसऱ्या डावात मात्र पुन्हा एकदा आनंदला ४१ चालींत पराभव मान्य करावा लागला. आनंदला आता लिरेन आणि पीटर लेको यांच्यासमवेत सहा गुणांसह अखेरच्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. आनंदने सातव्या फेरीत सोमवारी बोरिस गेलफंडला नमवत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला होता. मात्र ती लय आठव्या फेरीत आनंदला राखता आली नाही.

नॉर्वेच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने आर्मेगेडॉन पद्धतीद्वारे रशियाच्या इयान नेपोमनियाचीचा पराभव केला. उभय खेळाडूंमधील लढतीतील चारही डाव २-२ बरोबरीत संपल्याने टायब्रेकर खेळवण्यात आला. त्यात कार्लसनने बाजी मारली. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळत असल्याने कार्लसनला तीन गुणांची कमाई करता आली. कार्लसनने एकूण २२ गुणांसह अग्रस्थान राखले आहे. कार्लसनने आतापर्यंत आठही लढती जिंकल्या आहेत. नेपोमनियाचीने १९ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.