News Flash

लिस्टर सिटीला जेतेपद

लिस्टर सिटीने बलाढय़ चेल्सीचा १-० असा पराभव करत एफए चषकावर नाव कोरले.

लिस्टर सिटीने बलाढय़ चेल्सीचा १-० असा पराभव करत एफए चषकावर नाव कोरले. लिस्टर सिटीने क्लबच्या १३७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एफए चषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली.

यौरी टिलेमान्स याने ६३व्या मिनिटाला केलेला गोल स्पर्धेच्या १४९ वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम ठरला. टिलेमान्सने ३० मीटरवरून मारलेला फटका थेट गोलजाळ्यात गेला. याआधी लिस्टर सिटीला चार वेळा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. १९६९मध्ये त्यांनी अखेरच्या वेळी एफए चषकाची अंतिम फेरी गाठली होती.

‘‘आम्ही जेतेपद पटकावले यावर विश्वासच बसत नाही. त्यामुळे र्निबध असले तरी जल्लोष करताना मी आखडता हात घेतला नाही,’’ असे लिस्टर सिटीचा गोलरक्षक कास्पेर श्मेइचेल याने सांगितले.

थॉमस टकेल यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या चेल्सीने पहिल्या सत्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. पहिल्या सत्रात दुखापत झाल्यामुळे लिस्टरला जॉनी इव्हान्सची उणीव भासली. अखेर ६३व्या मिनिटाला चेल्सीच्या पारडय़ात गोल केल्यानंतर टिलेमान्सने चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि लांबूनच चेंडूला गोलजाळ्यात पोहोचवले.

टकेल यांनी बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी लकम हडसन-ओडोइ, बेन चिलवेल, काय हावेट्र्झ, ऑलिव्हियर जिरूड, ख्रिस्तियन पुलिसिक यांना मैदानात उतरवले, पण लिस्टरचा गोलरक्षक श्मेइटेलच्या भक्कम बचावासमोर त्यांना बरोबरी साधण्यात अपयश आले.

लेव्हांडोवस्कीची गोलविक्रमाशी बरोबरी

बायर्न म्युनिकचा अव्वल खेळाडू रॉबर्ट लेव्हांडोवस्की याने बुंडेसलीगा फुटबॉलमध्ये एका मोसमात ४० गोल करणाऱ्या विक्रमाशी बरोबरी साधली. लेव्हांडोवस्कीने २६व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. लेव्हांडोवस्कीने गेर्ड म्युलर याने १९७२मध्ये रचलेल्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे बायर्नने फ्रेइबर्गविरुद्धची ही लढत २-२ अशी बरोबरीत सोडवली.

युव्हेंटसचा विजय

युव्हेंटसने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत इंटर मिलानवर ३-२ असा विजय मिळवत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे. युव्हेंटस ७५ गुणांनिशी पाचव्या स्थानी आहे.

बुंडेसलीगा फुटबॉल

सेरी-ए फुटबॉल स्पर्धा

एफए चषक फुटबॉल स्पर्धा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 1:06 am

Web Title: leicester city won the title ssh 93
Next Stories
1 जपानसाठी ऑलिम्पिक  आत्मघातकी!
2 रेयाल माद्रिदला झिदानची सोडचिठ्ठी?
3 दडपणाखाली खेळ उंचावण्याची प्रणतीमध्ये क्षमता – दीपा
Just Now!
X