गेल्या महिन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवला. करोनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अशी सुरूवात झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच देशांतर्गत स्पर्धांनाही सुरूवात झाली. इंग्लंडमध्ये देशांतर्गत कौंटी क्लब्सने क्रिकेट सामने खेळणं सुरू केलं. सध्या लँकशायरचा संघ बॉब विलिस ट्रॉफी २०२०मध्ये लीस्टरशायरबरोबर दोन हात करत आहे. त्याच सामन्यात एक विचित्र प्रकार घडला.

लँकशायर आणि लीस्टरशायर या दोन संघांमधील रविवारच्या सामन्या दरम्यान एक वादग्रस्त प्रकार घडला. लीस्टरशायरचा गोलंदाज डायटर क्लीनने लँकशायरच्या एका फलंदाजाला अतिशय विचित्र पद्धतीने थेट अंगावर चेंडू फेकून मारल्याची वादग्रस्त घटना घडली. लँकशायरचा फलंदाज डॅनी लॅम्बने डावखुरा वेगवान गोलंदाज क्लेन याच्या गोलंदाजीवर सरळ फटका मारला. चेंडू सरळ गोलंदाजाकडे जातोय हे पाहिल्यावर फलंदाजाने धाव घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. पण गोलंदाजाने मात्र त्वेषाने चाल करून जात फलंदाजाच्या अंगावर चेंडू फेकून मारला. चेंडू लागल्याने कळवळून फलंदाजाने हातातील बॅट तिथेच टाकली आणि तो स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला.

पाहा व्हिडीओ-

लँकशायरला या घटनेसाठी पाच पेनल्टी धावा बहाल करण्यात आल्या. लँकशायरने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये ही माहिती दिली. क्रिकेटच्या नियमांनुसार फलंदाजाला जाणीवपूर्वक चेंडू फेकून मारल्याप्रकरणी ५ धावांचा भुर्दंड गोलंदाजाच्या संघाला पडला.