क्रिकेट, हॉकी खेळाडूंचे विविध स्पर्धाच्या निमित्ताने विदेश दौरे सातत्याने सुरूच असतात. प्रचार-प्रसार आणि निधीउभारणी या बाबतीत मर्यादित स्वरूपाच्या खेळांच्या नशिबी हे भाग्य सहजासहजी मिळत नाही. परंतु संघटकांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला लंगडी खेळ देशांच्या सीमा ओलांडून परदेशवारीसाठी सज्ज झाला आहे. काही महिन्यांपूर्वी भारतातील लंगडीचा संघ नेपाळमध्ये प्रचार-प्रसारासाठी दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर आता भारतीय संघ भूतानच्या दौऱ्यावर दक्षिण आशियाई जेतेपद प्राप्त करण्यासाठी तय्यार झाला आहे. या स्पध्रेत यजमान भूतानसह नेपाळच्या संघाशी भारतीय संघ मुकाबला करणार आहे. या संघाचे सराव शिबीर मुंबईत सुरू असून, त्यानंतर लगेचच हा संघ भूतानसाठी रवाना होणार आहे.
‘‘नेपाळच्या दौऱ्याचा अनुभव असल्याने भूतानचे आव्हान खडतर वाटत नाही. विदेश दौऱ्यात वातावरणाचा फरक पडतो. त्यानुसार खेळात काही बदल करावे लागतात. लंगडीत आवश्यक असणारी कौशल्ये खो-खो खेळतानाही उपयोगी पडतात. विदेश दौऱ्यांमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते. भारताचे प्रतिनिधित्त्व करायला मिळणे हा अभिमानास्पद क्षण असतो,’’ असे या संघातील मुंबईकर खेळाडू अनिकेत आडारकरने सांगितले. तालुका-जिल्हा-राज्य- राष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध केलेला अनिकेत दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ‘‘नेपाळमध्ये सौजन्यपूर्ण वागणूक मिळाली. भूतानबद्दल उत्सुकता आहे, सर्वोत्तम कामगिरी करून भारताला जेतेपद मिळवून देऊ,’’ असा विश्वास अनिकेतने व्यक्त केला.
शालेय अभ्यासक्रमातील ‘कठीण पर्व’ अर्थात दहावीत जाणारी मुंबईकर साक्षी पिळणकर महिला संघाची अविभाज्य घटक आहे. ती म्हणाली, ‘‘भारतासाठी खेळताना विविध राज्यांतील अनेक खेळाडू संघात असतात. भाषेचा प्रश्न उद्भवतो. परंतु त्यामुळेच खूप काही शिकायला मिळते, खेळात सुधारणा करता येते. दहावीचा अभ्यास आणि सराव अशी कसरत करावी लागते, परंतु खेळताना आनंद मिळतो.’’ आईकडून खेळाचा वारसा मिळालेल्या साक्षीने महाविद्यालयीन कारकीर्दीतही खेळ सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.

लंगडी हा सर्वागसुंदर खेळ आहे. हा खेळ खेळण्यासाठी कोणतीही महागडी उपकरणे लागत नाहीत. आतापर्यंत अन्य खेळांना पूरक म्हणून या खेळाकडे पाहिले जात आहे. परंतु विविध देशांच्या दौऱ्यांमुळे लंगडीला स्वतंत्र ओळख मिळते आहे. देशातील सर्वोत्तम खेळाडू भूतान दौऱ्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे जेतेपद आम्हीच पटकावू. खेळाबरोबरच आरोग्य चांगले राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या खेळाला पालकांचा पाठिंबा लाभल्यास खेळाचा विकास व्यापक प्रमाणावर होऊ शकतो.’’
डॉ. कमलेश शर्मा, भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक

‘‘राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामुळे देशातील सर्वोत्तम खेळाडूंची ओळख झाली. हे सगळे गुणवान खेळाडू आहेत. त्यांची कौशल्ये घोटीव करण्यासाठी या सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विदेश दौऱ्यामुळे वेगळ्या भौगोलिक वातावरणात चांगला खेळ करण्याचे आव्हान खेळाडूंसमोर आहे. यासाठीच त्यांच्या तंदुरुस्तीवर भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत लंगडीचा समावेश झाल्यास खेळाच्या प्रसाराला गती मिळेल. लीग स्वरूपाची स्पर्धा सुरू झाल्यास खेळाडूंना आर्थिक फायदा होऊ शकतो.’’
योगेश मोरे, भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक