लुईस हॅमिल्टन आणि निको रोसबर्ग या मर्सिडिझ संघाच्या शर्यतपटूंमध्ये विश्वजेतेपदाचा मान पटकावण्यासाठी रंगलेली नाटय़मय चुरस अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री हॅमिल्टनने ब्राझिलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत बाजी मारून विश्वजेतेपदाच्या शर्यतीत अधिक रंजकता आणली आहे आणि अंतिम निकालासाठी फॉम्र्युला-वन चाहत्यांना अबु धाबी येथे मोसमातील अखेरच्या शर्यतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, हॅमिल्टन (३५५) आणि रोसबर्ग (३६७) यांच्यातील १२ गुणांच्या फरकामुळे रोसबर्गला अबू धाबीत दुसरे स्थानही विश्वजेतेपदासाठी पुरेसे आहे.

तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या हॅमिल्टनले आपल्या कौशल्याची झलक दाखवताना ब्राझील सर्किट गाजवले. पावसाच्या रिपरिपमध्ये झालेल्या या शर्यतीत हॅमिल्टनने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. त्याने ३ तास ०१ मिनिटे ०१.३३५ सेकंदात ७१ फेऱ्यांची ही शर्यत पूर्ण करीत अव्वल स्थानासह खात्यात २५ गुणांची भर टाकली. रोसबर्गने त्यापाठोपाठ ११.४५५ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि दुसरे स्थान पटकावले. रेड बुलच्या मॅक्स व्हेस्र्टापेनने २१.४८१ सेकंदाची अधिक कालावधी घेत तिसरे स्थान निश्चित केले.

विश्वजेतेपदाच्या शर्यतीत निको रोसबर्गवरील दडपण वाढले

  • ०९ लुईस हॅमिल्टनने २०१६च्या सत्रात ९ विजयांची नोंद केली आहे. विशेष म्हणजे गेल्या तिन्ही शर्यतीत हॅमिल्टनने बाजी मारताना हॅट्ट्रिक नोंदवली. रोसबर्गच्या नावावरही नऊ विजय आहेत.
  • ५२ हॅमिल्टनचा हा कारकीर्दीतील ५२ वा विजय ठरला. त्याने या कामगिरीसह चार वेळा विश्वजेतेपदाचा मान पटकावणाऱ्या अ‍ॅलन प्रोस्ट यांच्या नावावर असलेला ५१ विजयाचा विक्रम मोडला. विक्रमांच्या यादीत मायकेल शूमाकर ९१ विजयासह अव्वल स्थानावर आहे.

ही कामगिरी खराब निश्चित नाही. अग्रस्थानावरून सुरुवात करण्याचा आनंद मला संपूर्ण शर्यतीत घ्यायचा होता. पावसाचे आगमन हा शुभसंकेतच म्हणावा लागेल.

– लुईस हॅमिल्टन