यंदाच्या हंगामात शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या लुइस हॅमिल्टनने अमेरिकन ग्रां. प्री. शर्यतीमधील अव्वल स्थानासह विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हॅमिल्टनचे कारकीर्दीतील हे तिसरे विश्वविजेतेपद प्राप्त केले आहे.असंख्य चढउतारांनी भरलेल्या, पावसामुळे निसरडय़ा झालेल्या ट्रॅकवर हॅमिल्टनने दुसऱ्या स्थानापासून शर्यतीला सुरुवात केली. संघसहकारी निको रोसबर्गला २.८५० सेकंदांनी मागे टाकत हॅमिल्टनने यंदाच्या हंगामातील दहावे जेतेपद नावावर केले. या जेतेपदासह हॅमिल्टनचे ३२७ गुण झाले आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या रोसबर्ग आणि तृतीय स्थानी असलेल्या सेबॅस्टियन वेटेलला या दोघांना मागे टाकत हॅमिल्टनने दमदार आगेकूच करताना विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

‘‘रोसबर्ग जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. ४९व्या फेरीदरम्यान रोसबर्गच्या हातून चूक झाली आणि त्याच्या गाडीने लांबचे वळण घेतले. यामुळे आमच्यातले अंतर दुरावले आणि मी अव्वल स्थान ग्रहण करू शकलो असे हॅमिल्टनने सांगितले. विश्वविजेतेपद पटकावण्याची भावना अतीव आनंद देणारी आहे. माझ्या कारकीर्दीतील हा संस्मरणीय क्षण आहे. माझ्यापाठी खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार. माझ्या कुटुंबीयांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे,’’ असे हॅमिल्टनने सांगितले.
तीन विश्वविजेतेपदे पटकावणारा हॅमिल्टन जॅकी स्टुअर्ट यांच्यानंतरचा केवळ इंग्लंडचा दुसरा शर्यतपटू आहे. सलग दोन विश्वविजेतेपद पटकावणारा तो पहिलाच शर्यतपटू आहे.

अमेरिकन ग्रां.प्री. शर्यतीत अव्वल