तंत्रज्ञान असो की खेळ- चीनची प्रगती हा सगळ्यांसाठीच एक अद्भुतरम्य समीकरण ठरले आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतही याचा प्रत्यय आला. चीनच्या ली नाने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या आणि भन्नाट फॉर्मात असलेल्या मारिया शारापोव्हाला चीतपट करत अंतिम फेरीत धडक मारली. सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देणाऱ्या स्लोअन स्टीफन्सला नमवत व्हिक्टोरिया अझारेन्काने अंतिम फेरी गाठली. पुरुषांमध्ये जेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि गतविजेता नोव्हाक जोकोव्हिचने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान पटकावले.
२०११ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावत ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी लि ना आशियातील पहिली महिला खेळाडू ठरली होती. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यासाठी लि ना सज्ज झाली आहे.  
स्पर्धेत आतापर्यंत केवळ नऊ गुण गमावणाऱ्या शारापोव्हाचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. पहिल्याच गेममध्ये शारापोव्हाने दुहेरी चुका केल्या. अचूक सव्‍‌र्हिस आणि जमिनीलगतचे फटक्यांवर भर देत लि लाने पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये लि नाने ३-२ अशी आघाडी घेतली. यानंतर शारापोव्हाने परतण्याचा प्रयत्न केला मात्र लि नाने जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला.
टेनिसचा हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळातील बारकाव्यांसह तंदुरुस्तीसाठी नवीन प्रशिक्षक कालरेस रॉड्रिग्झ यांचे मार्गदर्शन लि नासाठी उपयुक्त ठरले आहे. ‘२० वर्ष सातत्याने खेळल्यानंतर हा माझ्या कारकीर्दीतला सर्वोत्तम सामना होता. सुरुवातीला माझ्यावर थोडे दडपण होते. मला या सामन्यात विजय मिळवायचाच होता’, असे लि नाने सांगितले.
अंतिम फेरीत लि नाला गतविजेत्या व्हिक्टोरिया अझारेन्काचा सामना करावा लागणार आहे.
दुखापतींनी सतवलेल्या सेरेनाला नमवणाऱ्या स्लोअन स्टीफन्सवर ६-१, ६-४ मात करत अझारेन्काने अंतिम फेरीत स्थान पक्के केले. मात्र अझारेन्काच्या विजयाला वादाची किनार होती. पहिला सेट जिंकून दमदार आगेकूच करणाऱ्या अझारेन्काने तब्बल पाच मॅचपॉइंट गमावले. यानंतर बरगडय़ा तसेच गुडघ्याच्या उपचारांसाठी १० मिनिटे वैद्यकीय मदतीसाठी विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर परतल्यानंतर अझारेन्काने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत दुसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला.
‘या सामन्यात पराभव मला मान्यच झाला नसता. पराभव नाहीच.. म्हणून मी निराश झाले होते. मला धड श्वासही घेता येत नव्हता. मी सामन्यात परतले हे निश्चितच मोठे यश आहे. विजयाने मी खुप आनंदित आहे’, असे अझारेन्काने सांगितले.  
जेतेपदाच्या दिशेने दमदार वाटचाल करणाऱ्या जोकोव्हिचने स्पेनच्या डेव्हिड फेररचे आव्हान ६-२, ६-२, ६-१ असे सहज मोडून काढले. अंतिम फेरीत जोकोव्हिचचा मुकाबला रॉजर फेडरर आणि अँडी मरे यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
भारताचे आव्हान संपुष्टात
खेळापेक्षा अंतर्गत वादांचा फटका भारताला या स्पर्धेतही बसला. लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा पाठोपाठ सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांना मिश्र दुहेरीत खेळताना पराभवाला सामोरे जावे लागले आणि स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. चेक प्रजासत्ताकच्या ल्युसि राडेका आणि फ्रँटिसेक कर्माक जोडीने सानिया मिर्झा- बॉब ब्रायन जोडीचा ७-५, ६-४ असा पराभव केला. दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या जर्मिला गाजाडोस्वा आणि मॅथ्यू इब्डेन जोडीने महेश भूपती- नादिया पेट्रोव्हा जोडीवर ३-५, ६-३, १३-११ अशी मात केली.