बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेन्काला गतवर्षीचे विजेतेपद राखण्याची उत्सुक आहे, तर असंख्य चाहत्यांची लाडकी चीनची लि ना हिने तिच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद जिंकून हंगामाचा प्रारंभ झोकात करण्यासाठी या दोघीही सज्ज झाल्या आहेत.
उपांत्य फेरीत लि ना हिने मारिया शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले होते. मेलबर्न पार्कचे मैदान आपले घरचे मैदान मानणाऱ्या लि ना हिने या ठिकाणी सातत्यपूर्ण खेळ केला आहे. अझारेन्का हिने उपांत्य फेरीत स्लोआनी स्टीफन्सवर ६-१, ६-४ अशी मात केली होती. त्यावेळी दुसऱ्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी तिच्याकडे असताना पाच वेळा तिने मॅचपॉइंट गमावले होते. तिने मनगट दुखावल्याचे व पाठीतील स्नायूंच्या वेदना होत असल्याचे निमित्त करीत वैद्यकीय उपचाराकरिता बराच वेळ घेतला होता. तिने वेळकाढूपणा करीत अखिलाडू वृत्तीचा प्रत्यय घडविला अशी टीका तिच्यावर करण्यात आली. स्टीफन्सनेही तिच्या या वेळकाढूपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
अंतिम सामन्यात लि ना हिनेच विजेतेपद मिळवावे अशी इच्छा ऑस्ट्रेलियातील अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे. साहजिकच प्रेक्षकांचा अधिकाधिक पाठिंबा तिला मिळेल अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनीही अझारेन्कास टीकेचे लक्ष्य बनविले. तिने अंतिम सामना गमवावा अशीच इच्छाही अनेक स्तंभलेखकांनी आपल्या स्तंभात व्यक्त केली आहे. याबाबत अझारेन्काने सांगितले,‘‘मी वैद्यकीय उपचारासाठी वेळ मागून घेतली. त्याबाबत गैरसमज पसरविण्यात आला आहे. मी हेतूत: तसे केले नव्हते आणि माझा तसा हेतूही नव्हता. अंतिम सामन्यात तुम्हाला वेगळी अझारेन्का पाहावयास मिळेल. विजेतेपद टिकविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे.’’