‘उदय देशपांडे यांना जीवनगौरव कशासाठी?’ हा ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांचा लेख शनिवारी ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाला होता. या लेखाला दिलेल्या उत्तरात ‘शिवछत्रपती पुरस्काराची निवड ही सर्वस्वी निवड समितीकडून होते, निवड प्रक्रियेत शासनाचा हस्तक्षेप नसतो’ असे राज्याच्या क्रीडामंत्र्यांनी  स्पष्ट केले आहे.

उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याविषयी वि. वि. करमरकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न उपस्थित करताना त्यांनी थेट माझ्या हेतूवरच शंका घेतली आहे. स्वत:ला क्रीडा क्षेत्रातील सगळे समजते, इतर सर्व मूर्ख आहेत, याच आविर्भावात त्यांनी लेखणी चालवली आहे. चुकीची माहिती ठासून मांडून उदय देशपांडे यांच्यावर स्वत:चा व्यक्तिगत राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करत जीवनगौरव या प्रतिष्ठित पुरस्काराला गालबोट लावण्याचे काम त्यांनी केले आहे. याशिवाय निवड समितीने घेतलेल्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार शासनाला असतो, असा जावईशोध करमरकर यांनी लावला आहे.

निवड समितीवरील सदस्य पद्मश्री धनराज पिल्ले, पद्मश्री प्रभाकर वैद्य, अर्जुन पुरस्कार विजेत्या रुचिता मेस्त्री, प्रदीप गंधे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे जय कवळी व पॅरालिम्पिक समितीचे प्रकाश घाग यांच्यासारख्या मान्यवर सदस्यांवर माझाच नाही तर समाजाचा जास्त विश्वास आहे. यापैकी कोणत्याही सदस्याने म्हणावे की, तावडे यांनी निवड समितीला व्यक्तीबदलाचा अधिकार आहे असे म्हटले. किंबहुना जीवनगौरव व साहसी क्रीडा पुरस्कार या निवडीच्या वेळी प्रत्यक्ष मी उपस्थित नव्हतो. त्या पुरस्कारांची पहिली तीन-तीन नावे निवड समितीनेच दिली. ती देताना सर्व नावे आणि त्यांचा सविस्तर परिचय हा सर्व समिती सदस्यांकडे उपलब्ध होता आणि त्या आधारेच निवड समितीने हा निर्णय घेतला.

शिवछत्रपती पुरस्कारामध्ये पारदर्शकता मी आग्रहपूर्वक आणली हे मान्यच करावे लागेल. ही निवड म्हणजे ज्या खेळाडूंनी अर्ज केले त्यांनी अर्जात सादर केलेल्या कागदपत्रानुसार त्यांना किती गुण मिळतात, हे संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाते. त्यावर आलेले आक्षेप मान्यवर खेळाडूंच्या समितीमार्फत तपासले जातात. ज्या समितीत प्रदीप गंधे, श्रीरंग इनामदार, शांताराम जाधव व अपर्णा पोपट यांचा समावेश आहे. यात माझा क्रीडामंत्री म्हणून कोणताही हस्तक्षेप नसतो. करमरकर म्हणतात की, देशपांडे यांची चौकट फक्त शिवाजी पार्कपुरती आहे. द्वेषाची भावना निर्माण झाली की कार्याची व्यापकता दिसणे अशक्यच आहे. योगायोगाने आज १४ देशांतील स्पर्धकांची आंतरराष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा देशपांडे यांनी आयोजित केली आहे, जी करमरकरांनी स्पष्ट केलेल्या चौकटीत म्हणजेच शिवाजी पार्क येथे आहे. मल्लखांब खेळाला शास्त्रशुद्ध आधार देऊन देशविदेशात उपयुक्तता देशपांडे यांनी वाढवली, ही माहिती करमरकरांना कोणीच दिली नसेल. वार्ताकन करण्यापूर्वी करमरकरांनी विचारले असते तर मीही ही माहिती दिली असती.

उदय देशपांडे यांच्यावर एका तरुण विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याबद्दल आरोप झाला होता व त्याबाबत निषेधही झाला होता. पण याबाबत संबंधित पोलीस ठाण्याकडून माहिती घेतल्यावरच निवड समितीच्या सदस्यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. त्यांच्या बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे करमरकर यांनी त्याबाबत निषेध केला होता. त्यांच्या वार्तापत्रात लिहिल्याप्रमाणे दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाल्यानंतरही टीका करण्यात ते आघाडीवर होते. त्यामुळे व्यक्तिगत द्वेषामुळेच करमरकर यांच्यासारख्या अतिशय ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराने जीवनगौरवसारख्या सन्माननीय पुरस्काराला गालबोट लावले आहे. इतकी द्वेषपूर्ण पत्रकारिता ज्येष्ठ पत्रकार करमरकर यांची असू शकते, हे मनाला पटत नसतानाही मान्य करावे लागते. तरी जीवनगौरव पुरस्कार हा निवड समितीने निवडलेल्या निकषांच्या आधारेच घोषित झाला आहे, हे ‘लोकसत्ता’च्या वाचकांना माहीत व्हावे यासाठी हा खुलासा करीत आहे.

पुरस्कार प्रक्रियेत हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार

उच्च न्यायालयाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या निर्णयाबाबत कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने झालेली असल्याने त्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली असल्याची शक्यता न्यायालयाने नाकारली आहे.  पद्मश्री धनराज पिल्ले, प्रभाकर वैद्य, अर्जुन पुरस्कार विजेती रुचिता मेस्त्री, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे प्रदीप गंधे, अन्य नामांकित खेळाडू आणि प्रशासकांनी घेतलेला निर्णय न्यायालयात दाद मागण्यासारखा नाही. तसेच संघटनांतील वादांमधून खेळाडूंचे नुकसान होत असेल, त्या वेळी खेळाडूंनी संघटनांकडे दाद मागितली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या वस्तुस्थितीनंतरही याचिकाकर्ती जिम्नॅस्टिकपटू अक्षदा वावेकरकडून तीन वकिलांनी वारंवार विनंती केल्यामुळे शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना न्यायालयाने केली असली तरी पुरस्कार सोहळ्यात कोणत्याही अंतरिम हस्तक्षेपास नकार दिला आहे. शिवछत्रपती पुरस्काराची प्रक्रिया मागील चार वर्षांप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने आणि सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळून केली आहे. तसेच पुलवामा घटनेच्या पाश्र्वभूमीवर रविवारी हा पुरस्कार वितरण सोहळा साधेपणाने पार पाडला जाणार आहे.