खुमकचाम संजीता चानूने राष्ट्रकुल स्पर्धेच्या सलामीच्या दिवशीला भारताला सुवर्णपदकाची अनोखी भेट दिली. तिच्या बरोबरीने भारताच्याच सेइखोम मिराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरले. संजीताने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात १७३ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर कब्जा केला तर मिराबाईने १७० किलो वजन उचलल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. संजीताला राष्ट्रकुल स्पर्धेचा विक्रम मात्र मोडता आला नाही. नायजेरियाच्या केची ओपराने १६२ किलो वजन उचलत कांस्यपदकाची कमाई केली. मणिपूरच्या या दोन पॉवरलिफ्टर्सनी गटात एकतर्फी वर्चस्व गाजवले. पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणाऱ्या कुंजराणीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी भारताला पदक मिळवून दिले. नवी दिल्लीत २०१० साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
संजीताने ७२ किलो वजन उचलले आणि त्यानंतर ७७ वजन उचलले. मिराबाई पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरली मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिने ७५ किलो वजन उचलले. क्लीन आणि जर्क प्रकारातही या दोघींमध्येच मुकाबला रंगला. जबरदस्त शारीरिक ताकदीचा प्रत्यय घडवत भारताच्या या दोघांनी आपली कामगिरी उंचावत अन्य देशातल्या पॉवरलिफ्टर्सना मागे टाकले.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने गुरुवारी पहिल्या दिवशी शानदार कामगिरी नोंदवली. संजिता चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले. त्याचबरोबर नवज्योत चाना आणि सुशीला लिक्माबम यांनी ज्युदो प्रकारात आपले पदक निश्चित केले आहे. टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि स्क्वॉश या प्रकारातही भारताने दमदार कामगिरी नोंदवली.