भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत वरिष्ठ खेळाडू असलेल्या मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातून अचानक वगळल्याचे टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. करिअरमध्ये ऐनभरात असताना मलाही असेच संघाबाहेर काढण्यात आले होते, असे त्याने म्हटले आहे. मिताली राजने पाकिस्तान आणि आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. तरीही तिला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. त्यानंतरच्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही तिला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नाही. हा सामना भारताने ८ गड्यांनी गमावला होता.

सौरव गांगुली म्हणाला की, भारताचे नेतृत्व केल्यानंतर मलाही डगआऊटमध्ये बसावे लागले होते. जेव्हा मिताली राजलाही संघातून बाहेर करण्यात आले. तेव्हा मी तिचे या ग्रूपमध्ये स्वागत असल्याचे म्हटले. पाकिस्तानविरोधातील २००६ मध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीची आठवण सांगताना तो म्हणाला की, कर्णधार जर तुम्हाला बाहेर बसण्यास सांगतो. तेव्हा तसे करा. मी फैसलाबादमध्ये तसेच केले होते. मी १५ महिन्यांपर्यंत एकदिवसीय सामना खेळलो नाही. विशेष म्हणजे तेव्हा मी कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत होतो. आयुष्यात असे होत असते. कधी-कधी जगात तुम्हाला बाहेरचा रस्ताही दाखवण्यात येतो.

परंतु, मितालीसाठी रस्ते बंद झालेले नाहीत. तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, कारण तुम्ही काहीतरी चांगले केले आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आणखी संधी चालून येतील. त्यामुळे मिताली राजला बाहेर बसण्यास सांगितल्यामुळे मला आश्चर्य वाटलेले नाही. मैदानावरील प्रतिक्रिया ऐकून मी निराश झालेलो नाही. परंतु, उपांत्य सामन्यात भारत पराभूत झाला. यामुळे मी निराश झालो आहे. कारण भारताचा संघ आणखी पुढे जाईल, असे मला वाटत होते. आयुष्यात कुठल्याच गोष्टीची खात्री नसते.

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबाबत गांगुली म्हणाला की, धोनी अजूनही टोलेजंग षटकार मारण्यास सक्षम आहे. तो संघात राहिला पाहिजे. तो एक चॅम्पियन आहे. टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदानंतर मागील १२-१३ वर्षांपासून त्याची कारकीर्द चांगली राहिली आहे.