ऑलिम्पिक उद्घाटन कार्यक्रमात जपानच्या संस्कृतीचे दर्शन

पीटीआय, टोक्यो

करोनाच्या सावटामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करत शुक्रवारी जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. दर वेळेप्रमाणे यंदा प्रेक्षकांचा पाठिंबा नसल्यामुळे ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यातील उत्सुकता काहीशी कमी झाली होती. मात्र तरीही सोहळ्यादरम्यान सादर करण्यात आलेले नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्तबद्ध संचलन या बाबींनी जगभरातील चाहत्यांची मने जिंकली.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर फक्त अतिमहत्त्वाच्या अतिथींच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. जपानचे सम्राट नरुहिटो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची पत्नी जिल बायडेन यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली. या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी नॅशनल स्टेडियमबाहेर हजारो चाहत्यांनी गर्दी केली, परंतु प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली.

उद्घाटन सोहळ्याला बरोबर २० सेकंद फटाक्यांची आतषबाजी करून प्रारंभ करण्यात आला. त्याशिवाय करोनामुळे प्राण गमावणाऱ्या जगभरातील नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली. यजमान जपानच्या खेळाडूंच्या चमूचे सर्वप्रथम आगमन झाल्यानंतर तेथील प्रसिद्ध वाद्य पथकाने सादरीकरण केले. तेथील लोकप्रिय गायिका मिसिआ सँग यांनी जपानचे राष्ट्रगीत गायले आणि त्यानंतर जपानी वर्णमालेप्रमाणे सर्व संघांच्या संचलनास सुरुवात झाली.

आता शनिवारपासून खऱ्या अर्थाने विश्वभरातील ११ हजारांहून अधिक खेळाडूंमध्ये ३३९ सुवर्णपदकांवर नाव कोरण्यासाठी चढाओढ पाहायला मिळेल. यामध्ये भारताच्या १२० खेळाडूंचा समावेश असून प्रथमच भारत १८ क्रीडा प्रकारांत सहभाग नोंदवणार आहे.

क्रीडा महासत्तेसाठी क्रीडामंत्र्यांची साद

नवी दिल्ली : भारताला क्रीडा क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास यायचे असल्यास केंद्र आणि प्रत्येक राज्य शासनाने एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममधून ठाकूर यांच्याकडून भारतीय क्रीडापटूंना आभासी शुभेच्छा देण्यात आल्या. बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम आणि हॉकीपटू मनप्रीत सिंग या ध्वजधारकांनी संचलनात भारताच्या १९ सदस्यीय पथकाचे नेतृत्व केले. त्या वेळी ठाकूर यांच्यासह आणखी काही सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात भारतीय पथकाला अभिवादन केले. ‘‘गेल्या काही वर्षांत भारताने क्रीडा क्षेत्रात नक्कीच भरारी घेतली आहे, परंतु भारताला महासत्ता बनवण्यासाठी केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाने पुढाकार घेणे आणि दोघांनी एकत्रितपणे कार्य करणे महत्त्वाचे आहे. एका राज्याने एकाच क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित केल्यास भारताला भविष्यात अधिकाधिक ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू गवसतील,’’ असे ठाकूर म्हणाले. त्याशिवाय यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या वाटचालीत ‘टॉप्स’ योजना आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा मोलाचा वाटा असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंचे संचलन ऑनलाइन पाहिले. यासंबंधीचे छायाचित्र मोदी यांनी ट्वीट करताना भारतीय खेळाडूंना पाठबळ दिले. तसेच संपूर्ण ऑलिम्पिकदरम्यान भारताच्या सर्व क्रीडापटूंचा जयघोष करण्याचे आवाहन मोदी यांनी जनतेला केले.

जपानची टेनिसपटू नाओमी ओसाकाने शुक्रवारी ऑलिम्पिक क्रीडाज्योत प्रज्ज्वलित केली.

नॅशनल स्टेडियमबाहेर ऑलिम्पिकविरोधात निदर्शने केली.