‘लिन डॅन’ या चार अक्षरांत बॅडमिंटनविश्वातील सार्वकालिक महान खेळाडू सामावला आहे. दोनदा ऑलिम्पिक सुवर्णपदक, तब्बल पाच वेळा ऑल इंग्लंड आणि जागतिक अजिंक्यपद या दोन्ही स्पर्धाची जेतेपदे यांच्यासह त्याची पोतडी भरली आहे. टेनिसचाहत्यांसाठी रॉजर फेडरर, क्रिकेटचाहत्यांसाठी सचिन तेंडुलकरचे जे स्थान त्याप्रमाणे बॅडमिंटनप्रेमींसाठी लिन डॅन हे श्रद्धास्थान आहे. थॉमस चषकाच्या निमित्ताने बॅडमिंटनविश्वाचा हा अनभिषिक्त सम्राट भारतात आला आहे. मात्र त्याच्या सामन्यांना हाताच्या बोटांवर मोजण्याइतके प्रेक्षक असल्याचे चित्र आहे. प्रतिस्पध्र्याला नामोहरम करणारे स्मॅशेस, कोर्टवरचा विद्युत वावर, अफाट ऊर्जा, लवचीक शरीरयष्टी, विविध जेतेपदांची आठवण म्हणून गोंदलेले पाच भन्नाट टॅटू. हे ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्याची संधी दिल्लीकरांना आहे, मात्र तूर्तास तरी चांगले खेळाडू आणि त्यांचा दमदार खेळ पाहण्यासाठी दिल्लीकर पैसे मोजण्यासाठी तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
थॉमस आणि उबेर चषकाच्या आयोजनाची दुर्मीळ संधी मिळाल्यानंतर या स्पर्धेकडे प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवली आहे. पास संस्कृतीच्या सवयीमुळे मोठे नुकसान झाले आहे, असे संयोजन समितीचे सचिव आणि भारतीय बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष टी. पी. एस. पुरी यांनी सांगितले.
‘‘सिरी फोर्ट संकुलाची क्षमता २००० प्रेक्षकांची आहे. ७०० तिकिटे विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचे किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवून सामने पाहता येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित १२०० जागांसाठी पास देण्यात आले आहेत. दिल्ली राजधानीचे शहर असल्याने विविध स्तरांतून या पासेससाठी दडपण येत आहे. चांगले काही पाहण्यासाठी पैसा खर्च करण्यासाठी लोक तयार नाहीत, ही मनोवृत्ती चुकीची आहे. उर्वरित तिकिटांचे दर जास्त आहेत. मात्र ज्यांना मनापासून आवड आहे ते पैसा खर्च करण्यासाठी तयार आहेत. सुटय़ांचा कालावधी आणि दिल्लीत असलेली राजकीय गडबड या दोन कारणांमुळेही प्रेक्षकसंख्येवर परिणाम झाला आहे,’’ असेही पुरी म्हणाले.