व्हॅलेन्सिआवर ४-२ मात; अव्वल स्थानाच्या दिशेने वाटचाल

लिओनेल मेस्सीच्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेत व्हॅलेन्सिआवर ४-२ असा विजय मिळवला. या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या रिअल माद्रिदच्या दिशेने वाटचाल केली आहे.

काही दिवसांपूर्वीच बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत पॅरिस सेंट जर्मेन संघावर ६-१ असा दणदणीत विजय मिळवला होता. या विजयातून प्रेरणा घेत बार्सिलोनाने आणखी एका दिमाखदार प्रदर्शनासह विजय मिळवला. तारणहार मेस्सीच्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने विजय साकारला. इलिक्विम मँगलाने २९व्या गोल करत व्हॅलेन्सिआचे खाते उघडले. सहा मिनिटांत ल्युइस सुआरेझने बार्सिलोनासाठी गोल करत प्रत्युत्तर दिले. मध्यंतराच्या ठोक्याला मेस्सीने गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. मात्र अवघ्या काही सेकंदात व्हॅलेन्सिआच्या मुनीर अल हादादीने गोल केल्याने बरोबरी झाली. विश्रांतीनंतर नव्या ऊर्जेसह खेळणाऱ्या मेस्सीने ५२व्या मिनिटाला गोल करत बरोबरीची कोंडी फोडली. मेस्सीचा हा गोल बार्सिलोनासाठी निर्णायक ठरला. मात्र सामन्याच्या शेवटच्या सत्रात पिवळे कार्ड मिळाल्याने ग्रॅनडाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय लढतीत मेस्सी खेळू शकणार नाही. सामन्याच्या शेवटाच्या मिनिटाला आंद्रे गोमेसने गोल करत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

व्हॅलेन्सिआच्या २८ टक्क्यांच्या तुलनेत बार्सिलोनाने ७२ % टक्के गोलवर नियंत्रण राखले. ६१९ पासेस निर्माण करत बार्सिलोनाने गृहपाठ चोख असल्याचे सिद्ध केले. मात्र व्हॅलेन्सिआच्या आक्रमणाने बार्सिलोनाच्या बचावातील त्रुटी उघड झाल्या.

मँचेस्टर युनायटेडच्या विजयाला गालबोट

मिडल्सब्रघ : मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत मिडल्सब्रघवर ३-१ अशी मात केली. मात्र दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्ये झालेल्या कथित बाचाबाचीमुळे युनायटेडच्या विजयाला गालबोट लागले.

मिडल्सब्रघचा कर्णधार बेन गिब्सन आणि युनायटेडचा अ‍ॅशले यंग यांच्यात सामन्यानंतर वादावादी झाली. बाकी खेळाडूंनी दोघांना शांत केले. युनायटेडचा एरिक बेली आणि मिडल्सब्रघचा रुडी गेस्टाडे यांच्यात सामना संपल्यानंतर भांडण सुरु झाले. हे दोघे एकमेकांना चावल्याचे वृत्तही पसरले होते. मात्र हे दोघे केवळ हमरीतुमरीवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान सामन्यात मारुनी फेलिनीने ३०व्या मिनिटाला गोल करत युनायटेडचे खाते उघडले. यानंतर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. ६२व्या मिनिटाला जेस लिंगार्डने युनायटेडसाठी आणखी एक गोल केला. युनायटेडच्या बचावाला भेदत मिडल्सब्रघच्या रुडी गेस्टाडेने ७७व्या मिनिटाला गोल केला. भरपाई वेळेत अँटोनिओ व्हॅलेंन्सिआने गोल करत युनायटेडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.