अर्जेटिनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी व त्याचे वडील जॉर्ज यांना करआकारणीबाबत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.
मेस्सी व जॉर्ज यांच्यावर जवळजवळ पाच दशलक्ष डॉलर्सइतक्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बेलिझ व उरुग्वेमध्ये बोगस कंपन्या स्थापन करीत करआकारणी विभागाची दिशाभूल केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मेस्सीला या आरोपांतून वगळावे व त्याच्या वडिलांची सुनावणी केली जावी असा अर्ज न्यायालयाकडे सादर करण्यात आला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला. जॉर्ज यांना दीड वर्षे तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात दंडही आकारला जाणार आहे. करआकारणी विभागाच्या कायदेशीर सल्लागाराने मेस्सी याच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मुलाच्या वतीने आपणच सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत होतो. त्यामुळे आपल्या मुलावर खटला दाखल करू नये, अशी विनंती जॉर्ज यांनी केली आहे.