बार्सिलोना : फ्रान्सचा युवा खेळाडू उस्मान डेम्बेलेने ला लिगा फुटबॉलच्या लेगानेसविरुद्ध रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात बार्सिलोनासाठी पहिला गोल करून धडाक्यात सुरुवात केली. मात्र तरीही संघाला विजय मिळवून देण्यासाठी अनुभवी लिओनेल मेसीला मैदानावर उतरावे लागले आणि त्यानेच विजयी गोल झळकावत बार्सिलोनाला ३-१ असे यश मिळवून दिले.

कॅम्प नाऊ स्टेडियमवर झालेल्या या लढतीसाठी मेसीला सुरुवातीच्या ११ खेळाडूंत स्थान न देता राखीव ठेवण्यात आले होते. २१ वर्षीय डेम्बेलेने मध्यंतरापूर्वी मेसीची उणीवसुद्धा भासू दिली नाही. ३२व्या मिनिटाला त्याने संघासाठी पहिला गोल केला. मध्यंतरानंतर लेगानेसच्या मार्टिन ब्रॅथवेटने (५७ व्या मिनिटाला) गोल करत सामन्यात बरोबरी साधली.

दरम्यान ६९व्या मिनिटाला डेम्बेलेला घोटय़ाच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि त्याच्याएवजी मेसीचे मैदानावर आगमन झाले. बार्सिलोनासाठी नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लुईस सुआरेझने ७१व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल झळकावला. मात्र लेगानेसच्या खेळाडूंनी अखेरच्या मिनिटापर्यंत कडवी झुंज दिली. अखेरीस भरपाई वेळेत ९२व्या मिनिटाला मेसीने गोल करत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

२० सामन्यांतून ४६ गुण कमावणाऱ्या बार्सिलोनाने या विजयासह गुणतालिकेतील अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे, तर अ‍ॅटलेटिको माद्रिद तितक्याच सामन्यांतून ४१ गुणांनिशी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

लॅझिओला नमवून नापोली दुसऱ्या स्थानी

मिलान : जोस कॅलेजॉन आणि अकार्डीयस मिलिक यांनी अनुक्रमे ३४ व ३७ व्या मिनिटाला नोंदवलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर नापोली संघाने सेरी-ए फुटबॉल लीगमध्ये लॅझिओला २-१ असे पराभूत केले. सिरो इम्मोबाईलने (६५ मि.) लॅझिओसाठी एकमेव गोल केला. या विजयासह नापोलीने ४७ गुणांनिशी गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले असून ख्रिस्तियानो रोनाल्डोचा युव्हेंटस संघ ५३ गुणांसह प्रथम क्रमांकावर विराजमान आहे.