विजयांचा धडाका लावणाऱ्या बार्सिलोनाला ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात व्हॅलेंसियाने विजयासाठी अक्षरश: झुंजवले. मात्र सर्जिओ बस्केट्सने भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे बार्सिलोनाने हा सामना १-० असा जिंकला. खडतर सामन्यात विजय मिळवल्यानंतर आनंद साजरा करीत असताना चाहत्यांच्या गराडय़ातून फेकलेली पाण्याची बाटली लिओनेल मेस्सीच्या डोक्यावर आदळली.
दोन्ही संघांना गोल करण्याच्या अनेक संधी चालून आल्या असतानाही सामना अखेरच्या क्षणापर्यंत रंगला. अखेर बस्केट्सने भरपाई वेळेतील चौथ्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाला विजय मिळवून दिला. गेल्या आठवडय़ात ला लीगा आणि चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोलांचा विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या मेस्सीला मात्र विजयानंतरही वाईट गोष्टीचा सामना करावा लागला. चाहत्याने फेकलेली बाटली मेस्सीच्या डोक्यावर आदळली. बार्सिलोना संघाच्या फिजियोने मेस्सीची पाहणी केली. पण मेस्सीला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे जाहीर केल्यानंतर चाहत्यांना हायसे वाटले. पण याबाबत मेस्सीने रेफ्रींकडे तक्रार केली आहे. ज्या चाहत्याने हा प्रकार केला आहे, त्याचा शोध लागल्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय व्हॅलेंसिया संघाने घेतला आहे. या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत रिअल माद्रिदच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
‘‘या प्रकाराचा व्हॅलेंसियाला खेद वाटत असून त्या चाहत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. अशा प्रकारचे कोणतेही कृत्य आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे त्या चाहत्याला आम्ही यापुढे स्टेडियममध्ये उपस्थित राहू देणार नाही,’’ असे व्हॅलेंसिया संघाच्या पत्रकात म्हटले आहे.