* अर्जेटिनाचा पनामावर ५-० असा विजय
* उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित
कोणताही खेळाडू यशाच्या शिखरावर आणि चाहत्यांच्या हृदयसिंहासनावर विराजमान होतो तो त्याच्याकडे असलेली अद्भुत गुणवत्ता आणि अलौकिक शैलीमुळेच, यामधले एक नाव म्हणजे लिओनेल मेस्सी. दुखापतीतून सावरून मैदानातील पुनरागमन कसे असावे, याचा उत्तम वस्तुपाठ मेस्सीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या पनामाविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिला. दुसऱ्या सत्रात मैदानात आलेल्या मेस्सीने फक्त १९ मिनिटांमध्ये गोल हॅट्ट्रिक साजरी करत चाहत्यांसाठी अनोखा नजराणा पेश केला. मेस्सीच्या या तीन गोलमुळे अर्जेटिनाने पनामावर ५-० असा दणदणीत विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
दुखापतीनंतर मेस्सी या सामन्यात खेळणार का, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना होती. अर्जेटिनाने आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या सातव्या मिनिटालाच अर्जेटिनाच्या निकोलस ओटामेंडीने गोल करत संघाला खाते उघडून दिले. यानंतर अर्जेटिनाचा संघ अधिक आक्रमक होईल, असे वाटले होते. त्यांच्याकडून काही प्रयत्नही झाले, पण पनामाच्या बचावपटूंनी ते प्रयत्न हाणून पाडले. मध्यंतरापर्यंत अर्जेटिनाकडे १-० अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दहा मिनिटांमध्ये अर्जेटिनाला गोल करता आला नाही. अर्जेटिनाच्या व्यवस्थापनाने हे हेरले आणि योग्य वेळ साधत सामन्याच्या ६१ व्या मिनिटाला ऑगस्टो फर्नाडेझला बाहेर बोलवत मेस्सीला मैदानात उतरवले.
महान खेळाडू हे नेहमीच वेळ वाया न घालवता संधी निर्माण करतात आणि फक्त तेवढय़ावरच न थांबता यशही मिळवतात. मैदानात आल्यावर फक्त सातव्या मिनिटालाच पहिला गोल केला आणि मैदानात मेस्सीच्या नावाचा एकच जयघोष सुरू झाला. मेस्सी फक्त या एकाच गोलवर थांबला नाही. सामन्याच्या ७८व्या आणि ८७व्या मिनिटांना अजून दोन गोल करत मेस्सीने गोल हॅट्ट्रिक साजरी केली. त्यानंतर सर्गियो अग्युरोने ९० व्या मिनिटाला गोल केला.

व्हिडालच्या जोरावर चिली विजयी
फोक्सबोरोग : ऑटुरो व्हिडालच्या वादग्रस्त पेनेल्टी किकच्या जोरावर चिलीने बोलिव्हियावर २-१ असा विजय मिळवला. व्हिडालने सामन्याच्या ४६व्या मिनिटाला पहिला गोल लगावत चिलीचे गोलचे खाते उघडले. पम त्यानंतर काही मिनिटांमध्येच बोलोव्हियाने चिलीशी १-१ अशी बरोबरी केली. बोलिव्हियाच्या जे कॅम्पोसने ५६ मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी करून दिली. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये चांगलेच द्वंद्व पाहायला मिळाले. पण दोन्ही संघांचे आक्रमणांना यश मिळत नव्हते. चिलीच्या खेळाडूने मारलेला चेंडू बोलिव्हियाच्या लुईस गुटीइरेझच्या अंगाला लागला. त्या वेळी अमेरिकेचे पंच जैर मुरुफो यांनी लुईसच्या हाताला चेंडू लागल्याचा निर्णय देत चिलीला पेनेल्टी किक बहाल केली. पण त्यानंतर मैदानात दाखवण्यात आलेल्या याबाबतच्या दृश्यांमध्ये लुईसचा उजवा हात पाठीमागे होता आणि चेंडू त्याचा हाताला लागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट दिसत होते. पण चिलीला मिळालेल्या पेनेल्टीच्या संधीचे सोने या वेळी व्हिडालने केले. सामन्याच्या ९०व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाला २-१ असा विजय मिळवून दिला.