माद्रिद : अर्जेटिनाचा नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीने ला लिगा फुटबॉल कारकीर्दीतील साकारलेला ४००वा गोल व लुइस सुआरेझने नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने रविवारी मध्यरात्री इबार संघाचा ३-० असा पराभव केला. या विजयासह बार्सिलोनाने तूर्तास गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले असून त्यांच्या खात्यात १९ सामन्यांतून १३ विजयांसह एकूण ४३ गुण जमा आहेत.

ला लिगाच्या इतिहासात यापूर्वीच सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करणाऱ्या मेसीने ५३व्या मिनिटाला सुआरेझच्या पासवर गोलजाळ्याच्या उजव्या दिशेने चेंडू भिरकावत ४००वा गोल केला. त्यापूर्वी सुआरेझने १९व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला. तर ५९व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा व बार्सिलोनासाठी तिसरा गोल नोंदवून त्याने विजयावर शिक्कामोर्तब केले.

अन्य सामन्यात अँटोईन ग्रीझमनने ५७व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे नोंदवलेल्या एकमेव गोलच्या बळावर अ‍ॅटलोटिको माद्रिदने लेव्हांटेला १-० असे नमवले. सध्या अ‍ॅटलेटिको ३८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.