५००व्या गोलची नोंद; व्हॅलेन्सियाचा बार्सिलोनावर २-१ असा विजय; जेतेपदासाठी चुरस
बार्सिलोनाचा अव्वल आघाडीपटू लिओनेल मेस्सीने कारकीर्दीतील ५००व्या गोलची नोंद केली, परंतु क्लबच्या पराभवामुळे त्याचा हा विक्रम झाकोळला गेला. रविवारी मध्यरात्री झालेल्या ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या लढतीत बार्सिलोनाला व्हॅलेन्सियाकडून पराभव पत्करावा लागला. बार्सिलोनाच्या इव्हान रॅकिटीकचा स्वयंगोल आणि सँटी मिनाच्या निर्णायक गोलने व्हॅलेन्सियाला २-१ असा विजय मिळवून दिला. सर्व स्पर्धामधील मागील पाच लढतींतील बार्सिलोनाचा हा चौथा पराभव ठरला आहे.
बार्सिलोनाच्या या पराभवाच्या मालिकेमुळे ला लिगा स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत रंजकता आणली आहे. जेतेपदाच्या दावेदारांपैकी एक अ‍ॅटलेटिको माद्रिदने रविवारी ग्रॅनाडावर ३-० असा विजय मिळवून ७६ गुणांसह बार्सिलोनाशी बरोबरी साधली आहे. रिअल माद्रिद अवघ्या एका गुणाच्या फरकाने तिसऱ्या स्थानावर आहे.
दोन महिन्यांपूर्वी कॅम्प नाऊ येथे बार्सिलोनाने ७-० अशा फरकाने व्हॅलेन्सियावर दणदणीत विजयाची नोंद केली होती. त्याचा वचपा व्हॅलेन्सियाने रविवारी काढला. २६व्या मिनिटाला बार्सिलोनाच्या रॅकिटीकच्या स्वयंगोलने व्हॅलेन्सियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यात ४५ व्या मिनिटाला मिनाने भर घालत पहिल्या सत्रात व्हॅलेन्सियाला २-० असे आघाडीवर ठेवले.
दुसऱ्या सत्रात बार्सिलोनाकडून जोरदार आक्रमण झाले, परंतु त्याला तितक्याच ताकदीने व्हॅलेन्सियाच्या बचावफळीने उत्तर दिले. ६३व्या मिनिटाला मेस्सीने ही बचावफळी भेदली आणि पाच सामन्यांतील गोल दुष्काळही संपवला. मेस्सीच्या या गोलने बार्सिलोनाने गोलफरक १-२ असा कमी केला, परंतु त्यांना पराभव टाळण्यात अपयश आले. व्हॅलेन्सियाने सावध खेळ करत आघाडी कायम राखत विजय निश्चित केला.

अखेरचे पाचही सामने जिंकून क्लब जेतेपद राखण्यात यशस्वी ठरेल. क्लबला सध्या नशिबाची साथ मिळत नाही. अशा परिस्थितीचा निडरपणे सामना करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करू इच्छितो. गुणांचे अंतर कमी झाल्यामुळे आव्हानही वाढले आहेत. आमचा स्वत:वर विश्वास आहे.
– लुइस एन्रिक,
बार्सिलोनाचे प्रशिक्षक

०३: ला लिगा फुटबॉल स्पध्रेत २००३ सालानंतर सलग तीन सामने पराभूत होण्याची बार्सिलोनाची ही पहिलीच वेळ आहे.
५०० : लिओनेल मेस्सीने या लढतीत ५००व्या आंतरराष्ट्रीय गोलची नोंद केली. यापैकी ४५० गोल त्याने बार्सिलोनासाठी, तर ५० गोल अर्जेटिनासाठी केले आहेत.