बार्सिलोनाचा सेव्हिलावर ४-२ने विजय

उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे लिओनेल मेसी जवळपास तीन आठवडे बाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र त्याने केलेल्या शानदार कामगिरीमुळे बार्सिलोनाने सेव्हिलाचा ४-२ असा पराभव केला. आता दुखापतीमुळे मेसीला पुढील आठवडय़ाअखेरीस रंगणाऱ्या रिअल माद्रिदविरुद्धच्या एल क्लासिको लढतीलाही मुकावे लागणार आहे.

मेसीच्या उजव्या मनगटाचे हाड मोडल्याचे वैद्यकीय चाचणीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे तो तीन आठवडे खेळू शकणार नाही. बुधवारी होणाऱ्या इंटर मिलानविरुद्धच्या चॅम्पियन्स लीगमधील सामन्यात तसेच ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परतीच्या सामन्यात आणि ला लीगामधील रिअल माद्रिद व रायो व्हॅलेकानोविरुद्धच्या लढतीतही तो खेळू शकणार नाही. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. त्याच्याविनाच आम्हाला आता पुढील लढतींसाठी तयारी करावी लागेल, असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक एर्नेस्टो वाल्वेर्डे यांनी सांगितले.

चेंडू मिळवण्याच्या प्रयत्नात सेव्हिलाच्या फ्रांको वाझक्वेझशी झालेल्या झटापटीनंतर मेसी उजव्या हाताच्या कोपरावर जमिनीवर आदळला. हाताला प्रचंड वेदना होत असताना त्याला २६व्या मिनिटाला मैदानाबाहेर जावे लागले. फिलिपे कुटिन्हो (दुसऱ्या मिनिटाला), मेसी (१२व्या मिनिटाला), लुइस सुआरेझ (६३व्या मिनिटाला, पेनल्टी) आणि इव्हान राकिटिक (८८व्या मिनिटाला) यांनी गोल करत बार्सिलोनाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. सेव्हिलाकडून अखेरच्या क्षणी क्लेमेंट लेंगलेट (७९व्या मिनिटाला स्वयंगोल) आणि लुइस मुरिएल (९०व्या मिनिटाला) यांनी गोल केले.