अर्जेटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना करचुकवेगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश स्पेनच्या न्यायालयाने दिले आहेत. मेस्सी आणि त्याच्या वडिलांनी चार दशलक्ष युरोंचा कर चुकवल्याची सरकारी वकिलांची तक्रार बार्सिलोनानजिकच्या गावा येथील न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे मेस्सी आणि जॉर्ज यांना १७ सप्टेंबर रोजी न्यायाधीश अंजू देब राणी यांच्यासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेस्सीने २००७, २००८ आणि २००९ या वर्षांत मिळालेले उत्पन्न दडपून अचूक कर भरला नसल्याची तक्रार सरकारी वकील रचेल अमाडा यांनी केली आहे. ‘‘सरकारी वकिलांची तक्रार मान्य करणे, हा प्राथमिक चौकशीचा भाग आहे. त्यानंतर मेस्सीने खरोखरच गुन्हा केला आहे की नाही, याची चौकशी केली जाईल,’’ असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी मेस्सी आणि त्याचे वडील दोषी आढळल्यास, मेस्सीला त्याच्या उत्पन्नापैकी १५० टक्के दंड आणि दोन ते सहा वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.