लिओनेल मेस्सीच्या निर्णायक गोलच्या जोरावर बार्सिलोनाने ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेच्या रविवारी झालेल्या लढतीत मॅलेगावर २-१ असा विजय मिळवला. गेल्या आठवडय़ात स्नायूच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या मेस्सीने दमदार पुनरागमन करताना बार्सिलोनाला विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावून दिले.
मुनील एल हद्दादीने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून युरोपियन विजेत्या बार्सिलोनाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु जुआनपीने १३व्या मिनिटाला मॅलगाला बरोबरी मिळवून दिली. मात्र, दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेल्या मेस्सीने ५१व्या मिनिटाला अ‍ॅड्रीआनो क्लॅरोच्या पासवर व्हॉली लगावून अप्रतिम गोल केला. पाच वेळा वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या मेस्सीचा हा गोल निर्णायक ठरला. यंदाच्या हंगामातील २०वा गोल करत मेस्सीने बार्सिलोनाला (४८) गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावून दिले. अ‍ॅटलेटिको माद्रिद एका गुणाने पिछाडीवर आहे, तर ४३ गुणांसह रिअल माद्रिद तिसऱ्या स्थानावर आहे.
‘‘सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला गोल करून आम्ही चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर सामन्यावरील पकड निसटली आणि मध्यंतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीत होता. दुसऱ्या सत्रात आम्ही दमदार पुनरागमन केले आणि नेहमीसारखा खेळ केला,’’ असे मत बार्सिलोनाचा कर्णधार अँड्रे इनिएस्टा याने व्यक्त केले. या लढतीत दुखापतग्रस्त नेयमार आणि निलंबित गेरार्ड पिक्यूए यांच्याशिवाय बार्सिलोनाला खेळावे लागले, परंतु मेस्सी व लुईस सुआरेजच्या पुनरागमनाने ही पोकळी भरून निघाली. गेल्या आठवडय़ात कोपा डेल रे स्पध्रेत बार्सिलोनाच्या अ‍ॅथलेटिक बिलबाओविरुद्धच्या २-१ अशा विजयात मेस्सी आणि सुआरेजचा समावेश नव्हता.