08 March 2021

News Flash

मेस्सीच सर्वोत्तम ‘बलॉन डी’ऑर’ पुरस्काराचा मानकरी

४१.३३ टक्के मते मिळवत मेस्सीने बाजी मारली.

| January 13, 2016 07:09 am

अद्भुत गोलक्षमतेच्या जोरावर बार्सिलोना क्लब आणि अर्जेटिनाला विजयपथावर नेण्यात किमयागार लिओनेल मेस्सीला वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूसाठीच्या ‘बलॉन डी’ऑर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. पाचव्यांदा या पुरस्कारावर नाव कोरणारा मेस्सी पहिलाच खेळाडू आहे. या पुरस्कारासाठी मेस्सीसह पोर्तुगाल आणि रिअल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मेस्सीचा बार्सिलोना संघातील सहकारी नेयमार शर्यतीत होते. ४१.३३ टक्के मते मिळवत मेस्सीने बाजी मारली. महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या अमेरिकेच्या कार्ली लॉइडला सवरेत्कृष्ट महिला फुटबॉलपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बार्सिलोनाचे ल्युइस एन्रिक तर अमेरिकेच्या जिल एलिस सवरेत्कृष्ट प्रशिक्षक ठरले. वर्षांतील सवरेत्कृष्ट गोल पुरस्कारासाठी अ‍ॅटलेटिको गोइनइजच्या वेंडेल लिराची निवड झाली. झुरिच येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

मेस्सीने आपल्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाला ला लिगा, कोपा डेल रे आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. २०१५ या वर्षांत मेस्सीने ६१ सामन्यांमध्ये ५२ गोल करताना २६ वेळा गोल होण्यासाठी साहाय्यकाची भूमिकाही बजावली. २०१५ मध्ये झालेल्या सहा क्लब्स स्पर्धामध्ये मेस्सीने चेंडूला गोलपोस्टची दिशा दिली. यापैकी पाच स्पर्धामध्ये बार्सिलोनाने जेतेपदावर कब्जा केला. पुरस्कारासाठी दावेदार रोनाल्डोने २०१५ वर्षांत ५७ गोल, तर नेयमारने ४५ गोलची कमाई केली. पत्रकार, राष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार या पुरस्कारासाठी मतदान करतात. प्रत्येक व्यक्ती सर्वोत्तम तीन पर्यायांची निवड करतात. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या व्यक्तीची विजेता म्हणून निवड करण्यात येते. गुणांची बरोबरी झाल्यास पहिल्या पर्यायासाठी सर्वाधिक पसंती मिळवलेला खेळाडू विजेता ठरतो.

वर्षभरापूर्वी मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अर्जेटिनाला विश्वचषकातून गाशा गुंडाळावा लागला होता. बार्सिलोनाचे प्रशिक्षक एन्रिक यांच्याशी मेस्सीचे मतभेद झाले होते. यंदाच्या वर्षांत गुडघ्याच्या दुखापतीमुळे प्रदीर्घ काळ मेस्सीला मैदानापासून दूर राहावे लागले होते.

विश्वचषकात अंतिम लढतीत हॅट्ट्कि करणाऱ्या कार्ली लॉइडला पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी तिला अश्रू अनावर झाले.

.फिफा जागतिक संघ

पुरस्कार घोषणेच्या वेळी फिफातर्फे सर्वोत्तम जागतिक संघही जाहीर करण्यात येतो. यंदाही रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या प्रत्येकी चार खेळाडूंनी या संघात स्थान पटकावले. संघ : नेयमार, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, पॉल पोब्गा, आंद्रेस इनिएस्टा, ल्युका मोडरिक, मार्केलो, डेव्हिड सिल्व्हा, सर्जिओ रामोस, डॅनी अल्वेस, मॅन्युअल नेयुर (गोलरक्षक).

पाचव्यांदा या पुरस्काराठी निवड होणे माझ्यासाठी अनोखे आहे. मी खेळायला सुरुवात केली तेव्हा वर्षांतील सवरेत्कृष्ट पुरस्कारासाठी माझी पाचव्यांदा निवड होईल असे कधीही वाटले नव्हते. हे स्वप्नवत आहे. माझ्या संघातील सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. त्यांच्या सहकार्याशिवाय ही वाटचाल होणे कठीण होते.

लिओनेल मेस्सी, पुरस्कारप्राप्त फुटबॉलपटू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 7:09 am

Web Title: lionel messi wins 2015 ballon dor ahead of cristiano ronaldo neymar
टॅग : Lionel Messi
Next Stories
1 खराब कामगिरीवरूनही ख्रिस गेलवर टीकास्त्र
2 सानिया-मार्टिनाची विजयी सलामी
3 फिक्सिंगपासून उदयोन्मुख संघांनी दूर राहावे झ्र्कटलर
Just Now!
X