लिओनेल मेस्सी म्हटलं की आपल्यासमोर त्याचे विक्रम, त्याचे फुटबॉल कौशल्य, त्याची गोल करण्याची भूक लक्षात येते. फुटबॉलविश्वात त्याने अनेक दिग्गजांना मागे पछाडत आपलं अढळ स्थान निर्माण केलंय. नुकतंच त्यानं अर्जेंटिनाला कोपा अमेरिकेचं विजेतेपद मिळवून देत आपल्या १६ वर्षाच्या कारकिर्दीला नव्या शिखरावर नेऊन ठेवलंय. आता त्याने मैदानाबाहेरही एक मोठा विक्रम नोंदवलाय.

कोपा अमेरिका २०२१ स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्यानंतर मेस्सीनं इन्स्टाग्रामवर या चषकासोबतचा एक फोटो अपलोड केला होता. या फोटोला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २० मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. इतकेच नव्हे, हा फोटो क्रीडाविषयक फोटो म्हणून सर्वाधिक लोकांच्या पसंतीस उतरला आहे. याआधी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या एका फोटोला सर्वाधिक लाइक्स मिळाले होते, ज्यात त्याने दिवंगत फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना श्रंद्धांजली दिली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Messi (@leomessi)

मेस्सीनेही मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहत एक फोटो शेअर केला होता. या फोटोला १६.४ मिलियन लाइक्स मिळाले होते. इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक लाइक्स मिळालेल्या पोस्टमध्ये हा फोटो १६व्या क्रमांकावर होता.

मेस्सीचं स्वप्न झालं साकार

तब्बल २८ वर्षांची प्रतीक्षा संपवत अर्जेंटिनानं कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळलेल्या अर्जेंटिनानं बलाढ्य ब्राझीलला १-०ने नमवले. अँजेल डि मारियाच्या गोलमुळे अर्जेंटिनाचं स्वप्न साकार झाले. सामना संपल्यानंतर लिओनेल मेस्सी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो मैदानावरच रडू लागला. १६ वर्षांच्या कारकीर्दीतील हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद होते.

यापूर्वी १९९३ साली अर्जेंटिनानं ही स्पर्धा जिंकली होती. इक्वाडोर इथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यावेळी अर्जेंटिनाने मेक्सिकोचा २-१ अशा फरकाने पराभव केला होता. २०१५ व २०१६ मध्ये अर्जेंटिनाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, चिलीकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तब्बल २८ वर्षांपासून अर्जेंटिनाला विजयाची आस होती, यंदाच्या स्पर्धेत मिळवलेल्या विजयानं प्रतिक्षा संपली.