गुजरात संघाची बंगळुरूवर ६ विकेट्स राखून मात

अखेरच्या षटकात  १५ धावा करून इंडियन प्रीमिअर लीगमधले पहिले शतक पूर्ण करणाऱ्या विराट कोहलीचा आनंद क्षणिक ठरला. कर्णधार कोहलीच्या नाबाद शतकी खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उभा केलेला १८० धावांचा डोंगर गुजरात लायन्सने सहज पार केला. लायन्स संघाने घरच्या मैदानावर १९.३ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण केले. ब्रेंडन मॅक्क्युलम (४२) आणि दिनेश कार्तिक (नाबाद ५०) यांना या विजयाचे श्रेय जाते.

प्रथम फलंदाजी करताना  शेन वॉटसन (६) आणि एबी डी’व्हिलियर्स (२०) हे बिनीचे शिलेदार झटपट बाद झाल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८० धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार विराट कोहलीने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावून आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. त्याला लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी करून अप्रतिम साथ दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरूला दुसऱ्याच षटकात धवल कुलकर्णीने झटका दिला. अनुभवी फलंदाज वॉटसनला त्याने रवींद्र जडेजाकरवी झेलबाद करून तंबूत पाठवले. त्यानंतर आलेल्या डी’व्हिलियर्सने कोहलीसह संघाला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रवीण तांबेच्या फिरकीने घात केला. तांबेच्या गोलंदाजीवर डी’व्हिलियर्स  माघारी परतला. २ बाद ५९ अशा अवस्थेत असताना कोहलीने सामन्याची सारी सूत्रे आपल्या हातात घेत गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याला राहुलची तोलामोलाची साथ लाभली. या जोडीने १२ षटकांत जवळपास १०च्या सरासरीने १२१ धावांची भगीदारी रचली. अखेरच्या षटकात कोहलीला आयपीएलमधील पहिले शतक झळकावण्यासाठी १५ धावांची आवश्यकता होती. मात्र, ड्वेन ब्राव्होच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीने एक धाव काढून राहुलला स्ट्राइक दिला. राहुलनेही अगदी चतुराईने पुन्हा कोहलीकडे स्ट्राइक दिला. आता कोहलीला चार चेंडूंमध्ये १४ धावा हव्या होत्या. ब्राव्होच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचून त्याने हे अंतर कमी केले. अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार खेचून कोहलीने शतक पूर्ण केले आणि  कोहली नामाचा गजर दुमदुमला.

विजयासाठी १८१ धावांचा पाठलाग करताना ड्वेन स्मिथ आणि ब्रेंडन यांनी गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी ४७ धावांची आक्रमक भागीदारी केली. बंगळुरूचा अनुभवी गोलंदाज केन रिचर्डसनने स्मिथला बाद केले. स्मिथने २१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३२ धावा केल्या. स्मिथ बाद झाल्यानंतरही गुजरातचा धावांचा ओघ आटला नाही. ब्रेंडनने बंगळुरूच्या गोलंदाजांवर प्रहार करणे सुरूच ठेवले. त्याची २४ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावांची खेळी तबरेझ शम्सीने संपुष्टात आणली. रैनाने संयमी खेळ करीत धावफलक हलता ठेवला. उरलेले सोपस्कार कार्तिकने पूर्ण करत गुजरातला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. कार्तिकने ३९ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत २ बाद १८० (विराट कोहली नाबाद १००, लोकेश राहुल नाबाद ५१, प्रवीण तांबे १/२४, धवल कुलकर्णी १/३९) पराभूत वि. गुजरात लायन्स : १९.३ षटकांत ४ बाद १८२ (ड्वेन स्मिथ ३२, ब्रेंडन मॅक्क्युलम ४२, सुरेश रैना २८, दिनेश कार्तिक नाबाद ५०).