२०२० वर्षात भारतीय क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या राजीव गांधी खेळरत्न पुरस्कासाठी बीसीसीआयने मुंबईकर रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे. गेल्या वर्षभरातला रोहित शर्माचा चांगला फॉर्म, २०१९ विश्वचषक स्पर्धेत त्याने झळकावलेली ५ शतकं, कसोटी मालिकेतली आश्वासक कामगिरी या सर्वांमुळे बीसीसीआयने रोहितच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. खेलरत्न पुरस्कार हा भारतीय क्रीडा क्षेत्रातला मानाचा पुरस्कार मानला जातो. आतापर्यंत केवळ ३ क्रिकेटपटूंनाच हा सन्मान मिळाला आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला १९९७-९८ साली सर्वात पहिल्यांदा खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. यानंतर २००७ साली महेंद्रसिंह धोनीलाही खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. यानंतर गेल्या काही वर्षांत अनेक विक्रम मोडणारा भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीला २०१८ साली खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी रोहितची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याव्यतिरीक्त बीसीसीआयने इशांत शर्मा, शिखर धवन आणि दिप्ती शर्मा या भारतीय क्रिकेटपटूंची नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवली आहेत.