News Flash

रोहितची दीडशतकी खेळी व्यर्थ, भारताला पराभवाचा धक्का

ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ आणि बेलीची द्विशतकी भागीदारी

जॉर्ज बेलीची शतकी खेळी.

ऑस्ट्रेलियासमोर ३१० धावांचे आव्हान उभारुन देखील भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. स्टीव्हन स्मीथ (१४९) आणि जॉर्ज बेली (११२) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी भारताचे आव्हान चार चेंडू राखून गाठले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बरिंदर सरण याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांना अनुक्रमे आठ आणि पाच धावांवर माघारी धाडून संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. बरिंदरने त्याच्या पहिल्याच षटकात स्वत:च्याच गोलंदाजीवर आरोन फिंचचा झेल टिपला, त्यानंतर दुसऱ्या षटकात धोकादायक डेव्हिड वॉर्नरला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. सुरूवातीलाच बसलेल्या या दोन धक्क्यांमुळे ऑस्ट्रेलियन संघ बिकट अवस्थेत सापडला. मात्र, स्टीव्हन स्मिथ आणि जॉर्ज बेलीने संघाचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱया विकेटसाठी २४२ धावांची भागीदारी साकारून मालिकेत संघाला विजयी सुरूवात करुन दिली. बरिंदर सरणने पदार्पणात तीन विकेट्स घेतल्या, तर अश्विनने दोघांना माघारी धाडले पण धावांना लगाम घालण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि रविंद्र जडेजा यांना एकही विकेट मिळवता आली नाही.
तत्त्पूर्वी सलामीवीर रोहित शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३१० धावांचे लक्ष्य ठेवले. पण रोहितची खेळी वाया गेली. रोहित शर्माने १६३ चेंडूत नाबाद १७१ धावा करत दीडशतकाला गवसणी घातली. रोहित शर्माच्या या खेळीत १३ चौकार आणि सात षटकारांचा समावेश आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने डावाची सावध सुरूवात केली. मात्र, भारतीय संघाच्या धावफलकावर ३६ धावा लागल्या असताना सलामीवीर शिखर धवन तंबूत परतला. जोश हॅझलवूडने शिखरला नऊ धावांवर असताना शॉन मार्शकरवी झेलबाद केले. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा समाचार घेत २०७ धावांची भागीदारी रचली. दुर्देवाने विराट कोहलीचे शतक अवघ्या नऊ धावांनी हुकले. त्याने ९७ चेंडूंमध्ये ९१ धावा केल्या. विराटनंतर फलंदाजासाठी मैदानात आलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनीला जेम्स फॉल्कनरने झटपट बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉल्कनरने २ आणि जोश हॅझलवुडने एक बळी मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2016 9:32 am

Web Title: live cricket score india vs australia 1st odi
Next Stories
1 शहझादचे विक्रमी शतक
2 ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताला पसंती
3 ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे सराव अभियान सुरू
Just Now!
X