पर्थनंतर ब्रिस्बेनच्या वाका खेळपट्टीवरही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर ७ विकेट्सने मात करून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० ने आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत  ३०९ धावांचे भारताचे आव्हान यजमान ऑस्ट्रेलियाने केवळ ३ विकेट गमावून ४९ व्या षटकात गाठले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर भारताची गोलंदाजी निष्प्रभ ठरली आणि भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा पुन्हा एकदा लख्खपणे समोर आल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीजोडी अरोन फिंच आणि शॉर्न मार्श यांनी शतकी भागीदारी रचून पाया भक्कम केला. फिंच आणि मार्श यांनी प्रत्येकी ७१ धावा केल्या. त्यानंतर स्मिथने जॉर्ज बेलीच्या सहाय्याने धावसंख्येला आकार दिला. स्मिथ(४६) बाद झाल्यानंतर बेलीने ग्लेन मॅक्सवेलला हाताशी घेऊन विजयाकडे कूच केली. भारताकडून इशांत शर्मा, उमेश यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

तत्पूर्वी, भारताचा सलामीवीर रोहित शर्माने याही सामन्यात शतकी (१२४) खेळीचा नजराणा पेश केला. वाकाच्या खेळपट्टीवर १७१ धावांची खेळी साकरल्यानंतर रोहितने गाबा खेळपट्टीवरही शतकी खेळीने उपस्थितांचे मन जिंकले. रोहितने ११ चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने १२७ चेंडूत १२४ धावांची अप्रतिम खेळी साकारली. रोहितला अजिंक्य रहाणेने ८९ धावांची विश्वासू साथ दिली, तर कोहलीने ५९ धावा ठोकल्या. ब्रिस्बेनवरील शतकासह एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतील रोहितने १० वे शतक साजरे केले, तर या स्टेडियमवरील रोहितची ही खेळी भारताकडून सर्वाधिक धावसंख्येची वैयक्तिक खेळी ठरली. याआधी सचिनने ब्रिस्बेन स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यात ९१ धावांची खेळी सकारली होती.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला सुरूवातीलाच सलामीवीर शिखर धवन बाद झाल्याचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाच्या जोएल पॅरिसने  धवनला अवघ्या सहा धावांवर माघारी धाडले. मात्र, त्यानंतर रोहित आणि विराटने संयमी १२५ धावांची संयमी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. परंतु, विराट कोहली ५९ धावांवर असताना धावचीत झाला. त्यानंतर अजिंक्यच्या साथीने रोहितने संघाच्या धावसंख्येला आकार दिला. रोहित(१२४) आणि अजिंक्य(८९) माघारी परतल्यानंतर धोनी(११), पांडे(६), जडेजा(५), अश्विन (१) असे बाद झाले.