भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बेंगळुरू येथे सुरु असणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही पहिल्याच सामान्याचा कित्ता गिरवत भारतीय फलंदाजांनी सुमार कामिगिरीचे दर्शन घडवले. पुण्यातील मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघ काहीतरी शिकेल आणि मालिकेत पुनरागमन करेल, अशी आशा होती. मात्र, भारतीय फलंदाजांनी हराकिरी केल्यामुळे भारतीय संघाचा डाव १८९ धावांमध्ये आटोपला. केवळ लोकेश राहुल याचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज खेळपट्टीवर तगही धरु शकला नाही. त्यानंतर भारतीय गोलंदाजही ऑस्ट्रेलियाप्रमाणे काहीतरी कमाल करुन दाखवतील, अशी आशा होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद ४० धावा केल्याने त्याठिकाणीही भारताच्या पदरी निराशा पडली.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . मात्र, ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉन भारतीय गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. लोकेश राहुल वगळता एकही भारतीय फलंदाज त्याचा मुकाबला करु शकला नाही. डावाच्या सुरुवातीपासूनच भारताचे फलंदाज विशिष्ट अंतराने बाद होत गेले. या सामन्यासाठी मुरली विजय आणि जयंत यादव यांच्याऐवजी अभिनव मुकूंद आणि करुण नायर यांना संधी देण्यात आली होती. मात्र, सलामीला आलेल्या अभिनव मुकूंदला स्टार्कने पायचीच केले.  या सामन्यात चमक दाखवेल अशी अपेक्षा असलेला अभिनव मुकूंद भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. मात्र, या दोघांच्या जोडीने खेळपट्टीवर जम बसवला आहे असे वाटत असतानाच ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने पुजाराला झेलबाद केले. त्याने ६६ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर नॅथन लियॉनने एकापाठोपाठ एक बळी घेण्याचा सपाटा लावला. लोकेश राहुलने चेतेश्वर पुजाराच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारताचा डाव काहीसा स्थिरावला होता, असे वाटत होते. मात्र, उपहारापूर्वी पुजारा आणि उपहारानंतरच्या सत्रात विराट कोहली बाद झाल्याने भारतीय संघाच्या अडचणीत सापडला. त्यानंतर अजिंक्य रहाणे (१७) देखील खेळपट्टीवर फार काळ टिकाव धरू शकला नाही. लियॉनच्या चेंडूचा अंदाज न आल्यामुळे तो यष्टिचित झाला. यानंतर करूण नायरने लोकेश राहुलला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टीव्हन ओ कफीने त्याला २७ धावांवर बाद केले. त्यानंतर मैदानात आलेला आर. अश्विन (७) आणि वृद्धिमान सहा (१) आणि रविंद्र जाडेजा (३) यांनी मैदानावर केवळ हजेरी लावण्याचे काम केले. मात्र, ही सगळी पडझड सुरु असताना लोकेश राहुलने एक बाजू समर्थपणे लावून धरली होती. परंतु, लियॉनने ९० धावांवर असताना त्याला झेलबाद करवले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला ईशांत शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि भारतीय संघाचा डाव १८९ धावांमध्ये आटोपला.

दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश यांना निष्प्रभ केल्यानंतर भारतीय संघाचा विजयरथ ऑस्ट्रेलियावर चाल करण्यासाठी सज्ज होता. त्यासाठी पुण्यनगरीत फिरकीला अनुकूल खेळपट्टी तयार करण्यात आली. मात्र या दौऱ्यासाठी चोख अभ्यास करून आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने हे डावपेच भारतीय संघावर उलटवत दणदणीत विजय साजरा केला. त्यामुळे आता टीम इंडिया या मालिकेत पुनरागमन करणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. मात्र, भारताची आजची कामगिरी पाहता हा सामना जिंकणे तर सोडाच तो वाचविण्यासाठी भारतीय संघाला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागणार आहे. पुण्यात अडीच दिवसांत मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर बेंगळूरुत खेळपट्टी हा संवेदनशील मुद्दा ठरला आहे. पुण्याच्या तुलनेत या खेळपट्टीवर फलंदाजांना साहाय्य मिळेल अशी आशा आहे. तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टीवर चेंडू वळू लागेल अशी चिन्हे आहेत. गहुंजेच्या खेळपट्टीवर भारतीय संघ फिरकीच्या चक्रव्यूहात सापडला होता.