कॅनबेरा येथील चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने दिलेल्या ३४९ धावांच्या कडव्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ मोक्याच्या क्षणी ढेपाळला. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर २५ धावांनी मात करत पाच दिवसांच्या एकदिवसीय मालिकेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. यजमानांच्या ३४९ धावांंच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सर्वबाद ३२३ धावांपर्यंतच मजल मारता आली.  भारताची सुरूवात मात्र चांगली झाली होती. सलामीवीर रोहितने २५ चेंडूत ४१ धावा ठोकून आक्रमक सुरूवात करून दिली, तर पहिल्या तीन सामन्यांत निराशाजनक कामगिरी केलेल्या शिखर धवनला चौथ्या सामन्यात सूर गवसला. शिखरने ११३ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर १२४ धावा केल्या. तर भारताची ‘रन मशिन’ विराट कोहलीनेही मैदानात टिच्चून फलंदाजी करत एकदिवसीय करिअरमधील २५ वे शतक गाठले. शिखर आणि कोहलीच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने सामन्यावर पकड निर्माण केली होती. पण, शिखर बाद झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आल्या पावलीच माघारी परतला. त्यानंतर गुरूकिरत मान अवघ्या पाच धावांवर झेलबाद झाला आणि मोक्याच्या क्षणी कच खाण्याची भारतीय संघाची वृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. भारताचा डाव ३२३ धावांत संपुष्टात आला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आधीच्या तीनही सामन्यांप्रमाणे याही सामन्यात पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचे प्रदर्शन पहायला मिळाले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १८७ धावांची भागीदारी केली. मात्र वॉर्नरचे शतक अवघ्या सात धावांनी हुकले. इशांत शर्माने वॉर्नरला ९३ धावांवर बाद केले. वॉर्नरने ९२ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकार ठोकत ९३ धावा ठोकल्या. वॉर्नर बाद झाल्यानंतर आरोन फिंचने फटकेबाजी सुरूच ठेवत शतक झळकावले. फिंचला उमेश यादवने इशांत शर्माकरवी झेलबाद केले. फिंचने १०७ चेंडूत १०७ धावा केल्या. यामध्ये त्याने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या मिचेल मार्श आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी अनुक्रमे ३३ आणि ५१ धावा करत धावसंख्येत उपयुक्त भर घातली. स्मिथ बाद झाल्यानंतर मॅक्सवेलने २० चेंडूत ४१ धावा करत ऑस्ट्रेलियाला ३४८ धावांचा पल्ला गाठून दिला. भारताकडून उमेश यादव आणि ईशांत शर्माने प्रत्येकी तीन बळी मिळवले. आजच्या सामन्यात  बरिंदर सरणाच्या जागी संघात घेण्यात आलेला भुवनेश्वर कुमार पूर्णपणे निष्प्रभ ठरला. त्याने आठ षटकांत ६९ धावा दिल्या